युद्ध जिंकण्यासाठी संख्येची नाही, निष्ठावंतांची गरज असते आणि निष्ठावान सैनिक केवळ शिवसेनेकडे असल्याचे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मंगळवारी अहमदनगरच्या सभेत राज्यातील जनता शिवसेनेच्याच बाजूने कौल देईल असा ठाम विश्वास व्यक्त केला.
‘छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिर्वाद आणि चलो मोदी के साथ’ म्हणणाऱया भाजपला केवळ निवडणुकीवेळी शिवाजी महाराजांची आठवण होते. शिवजयंती उत्सव मोठ्या थाटात शिवसैनिकच साजरे करतात तेव्हा यांना शिवाजी महाराज आठवत नाहीत म्हणून केवळ शिवसेनेसारख्या निष्ठावंतांनाच शिवाजी महाराजांचा आशिर्वाद मिळेल, असेही उध्दव म्हणाले.
अफजलखानाची फौज सध्या महाराष्ट्रात आल्याच्या वक्तव्यावरून भाजपवाल्यांनी रान उठवले आहे मात्र, मी तर फक्त टोपी फेकली आता त्यांनी स्वत:हून टोपीत डोकं घातलं त्याला मी तरी काय करणार? अशी खिल्लीही उध्दव यांनी यावेली उडवली.
युती तोडण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. यांनीच इथून-तिथून उमेदवार गोळा करून युती तोडली, असेही ते पुढे म्हणाले.