केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एका दारूडय़ा व्यक्तीने पुण्यातील कोथरूडच्या प्रचारसभेत शूज मारण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला कार्यकर्त्यांनी चोप देऊन पोलिसांकडे सोपविले.
भारत कराड (वय ३७, रा. सुतारदरा) असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. गडकरी यांच्या पुण्यात दोन जाहीर सभा होत्या. त्यापैकी एक कोथरूड येथे होती. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, गडकरी कोथरूड येथील सभेच्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा व्यासपीठाजवळ अनेक लोक उभे होते. ते फुलांच्या पाकळ्या टाकून त्यांचे स्वागत करत होते. त्या वेळी एका तरुणाने पायातील शूज काढून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी तेथील कार्यकर्त्यांनी त्याला पकडले आणि चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तो एका पेट्रोल पंपावर काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.