कोकणात राहून मराठवाडा-विदर्भापर्यंत मोठय़ा संख्येने भक्तगण असलेले नरेंद्रमहाराज यांच्याकडे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही नेत्यांचा नेहमी वावर असतो. त्यापैकी कितीजण त्यांचे मनापासून भक्त आहेत, हे सांगता येणार नाही. पण महाराजांच्या माध्यमातून त्यांच्या भक्तसंप्रदायाचा मतरूपी आशीर्वाद आपल्याला मिळावा, किमान त्यांची नाराजी असू नये, यासाठी ते निश्चितपणे काळजी घेत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे राष्ट्रीय पातळीवरील विश्वासू सहकारी प्रफुल्ल पटेल किंवा lok07शिवसेनेचे मराठवाडय़ातील खासदार चंद्रकांत खरे यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांचा त्यामध्ये समावेश आहे.
सरकारी नोकरीला रामराम ठोकून सुमारे वीस वर्षांपूर्वी नरेंद्रमहाराज अध्यात्माकडे वळले. रत्नागिरीपासून सुमारे पंचवीस किलोमीटरवर, कोल्हापूर रोडवर नाणीज इथे त्यांचा भव्य आश्रम आहे. या ठिकाणी राज्याच्या विविध भागांतून भक्तगणांची रीघ सुरू असते. विशेषत: गुरुपौर्णिमा, गजाननमहाराज प्रकट दिन आणि खुद्द नरेंद्रमहाराजांचा याच महिन्यात असलेला वाढदिवस यांसारख्या वर्षांतील महत्त्वाच्या दिवशी इथे मोठा उत्सव होतो. त्यासाठी लाखाचा समुदाय जमतो. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी राज्याच्या आदिवासी पट्टय़ांमध्ये धर्मातर केलेल्या कुटुंबांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये आणून त्यांचं पुनर्वसन करण्याचं कार्य हाती घेतलं आहे. पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील वैष्णव पंथीयांच्या दक्षिण पीठाचं यजमानपद त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर मुंबई-गोवा महामार्गावर मोठय़ा प्रमाणात होणारे अपघात लक्षात घेऊन जागोजागी नरेंद्रमहाराज संस्थानाच्या रुग्णवाहिका रात्रंदिवस मोफत सेवा पुरवत असतात. अशा सामाजिक उपक्रमांमुळे त्यांचा प्रभाव वाढत गेला आहे.
राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या भक्तगणांचं अतिशय उत्तम संघटन नरेंद्रमहाराजांनी उभारलं असून जिल्हा, तालुका, गावपातळीपर्यंत त्यांचं जाळं आहे. या संघटनात्मक बांधणीमुळेच राजकारणी मंडळी त्यांच्याकडे आकृष्ट झाली आहेत. कारण, ते स्वत: राजकारणापासून दूर राहतात. पण एखाद्या उमेदवारावर ‘अनुग्रह’ करण्याचं त्यांनी ठरवलं तर या नेटवर्कमधून ते साध्य होऊ शकतं. काही जाणकारांच्या मते, राज्यातील सुमारे ४० ते ५० मतदारसंघांवर प्रभाव टाकण्याची त्यांची क्षमता आहे. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाचं निमंत्रण राजकारणी मंडळी सहसा नाकारत नाहीत. पण या क्षमतेचा नरेंद्रमहाराज सरसकट वापर करत नाहीत, असे त्यांचे अनुयायी सांगतात.