News Flash

भीमशक्ती दुभंगली! डांगळे यांचा सेनेला पाठिंबा

केवळ एका नेत्याच्या खासदारकीभोवती व मंत्रिपदाभोवती फिरवत ठेवलेल्या रिपब्लिकन पक्षात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठी फूट पडली आहे.

| September 29, 2014 07:57 am

केवळ एका नेत्याच्या खासदारकीभोवती व मंत्रिपदाभोवती फिरवत ठेवलेल्या रिपब्लिकन पक्षात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठी फूट पडली आहे. भाजपबरोबर जाण्याच्या आठवले यांच्या निर्णयामुळे नाराज झालेले पक्षाचे ज्येष्ठ नेते अर्जुन डांगळे यांनी पक्षातून बाहेर पडून शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला, तर पक्षाचे आणखी एक ज्येष्ठ कार्यकर्ते काकासाहेब खंबाळकर यांनीही आठवलेंची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसला समर्थन दिले. त्यामुळे आठवले यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघातून बाहेर पडल्यानंतर गेली दहा वर्षे डांगळे हे आठवलेंसोबत होते. मात्र भाजपसोबत जाण्याच्या आठवले यांच्या निर्णयावरून ते नाराज होते. युतीमध्ये फूट पडल्यानंतर कोणत्या पक्षासोबत जावे, याबाबत निर्णय घेण्यास आठवले यांनी विलंब लावल्याने रिपाइं कार्यकर्त्यांत संभ्रम होता. शेवटी केंद्रात मंत्रिपद देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आठवले यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यासाठी विधानसभेच्या जागा कमी करण्याचीही तयारी दर्शवली. त्यामुळे पक्षातील काही नेते व कार्यकर्ते नाराज झाले. डांगळे यांनी या नाराजीला वाट करून देत शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. सोमवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. आठवले यांच्यावर आपण अजिबात नाराज नाही; परंतु कार्यकर्त्यांच्या भावना जाणून आपण पक्षातून बाहेर पडण्याचा व सेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला. दुसरीकडे, काकासाहेब खंबाळकर यांनीही नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत रिपब्लिकन फ्रंट या नावाने नवीन गट स्थापन करून राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला. ठाण्यातील रिपब्लिकन पक्षाचे नेते गंगाराम इंदिसे यांनीही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2014 7:57 am

Web Title: split in ramdas athavales republican party
टॅग : Ramdas Athavale
Next Stories
1 वाईतील ‘चिल्लर’बाज उमेदवाराचा अर्ज अवैध
2 काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात महाराष्ट्राचा विकास खुंटला- गडकरी
3 बाळासाहेबांनी भाजपला लाथाडले असते!
Just Now!
X