विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास आता अवघे दोनच दिवस हाती राहिल्यामुळे रविवारच्या सुटीचा योग साधत सर्वच पक्षांनी जाहीर सभांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वच पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या सभांमुळे रविवार प्रचारवार ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा सोमवारी संध्याकाळी पाच वाजता थंडावणार आहेत. मुळातच निवडणूक आयोगाकडून प्रचारास मिळालेला कमी कालावधी आणि आघाडय़ांचा घोळ यामुळे मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांची दमछाक होत आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी जाहीर सभांवर भर दिला आहे. शनिवारी राज्याच्या अन्य भागात प्रचार सभांचा धडाका लावणाऱ्या नेत्यांनी अखेरच्या टप्यात आपला मोर्चा ठाणे- मुंबईकडे वळविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा ठाण्यात होणार आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भिवंडी, काळाचौकी, शीव-कोळीवाडा, वांद्रे, मानखुर्द येथे सभा होणार आहेत.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची लालबाग येथे सभा आहे. तर शिवसेना पक्षपमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा शेवटचा रविवार सेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकण आणि मुंबईतील सभांसाठी राखीव ठेवला आहे. दापोली, श्रीवर्धन, आलिबाग, कर्जत या कोकणातील मतदारसंघांत दिवसभर सभा घेऊन उद्धव ठाकरे हे सायंकाळी मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलात सभा घेणार आहेत.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागाठाणेत जाहीर सभा होणार असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आपल्या रायगड जिल्ह्यावर तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा घेण्यासाठी हा प्रचाराचा शेवटचा रविवार वापरण्याचे ठरवले आहे.