ठाणे जिल्ह्य़ातील शिवसेनेत निष्ठावंत आणि उपरा हा जुना वाद पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. अगदी काल-परवा शिवसेनेत दाखल झालेल्या काही इच्छुक नेत्यांना उमेदवारी मिळेल, अशी चाहूल लागताच पक्षातील काही अस्वस्थ जुन्या पदाधिकाऱ्यांनी बंडाचा भगवा हाती घेण्याची तयारी सुरू केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
कल्याण, भिवंडी, ठाणे, नवी मुंबई परिसरातील पक्षातील या अस्वस्थ पदाधिकाऱ्यांनी संपर्कप्रमुख आमदार एकनाथ िशदे यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली असून बाहेरून आलेला उमेदवार खपवून घेतला जाणार नाही, असे इशारेही दिले जात आहेत.
लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशामुळे शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांत प्रवेश करण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी सुरू झाली आहे. निवडणुकीची गणिते लक्षात घेऊन या पक्षांच्या नेत्यांनीही इच्छुकांच्या प्रवेशाचा धडाका लावला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता टोकाला पोहोचली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे अशा पक्षांमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या काही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू केल्यामुळे हा वाद चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ठाणे शहरात रवींद्र फाटक, कल्याण पश्चिमेत सुभाष भोईर, भिवंडीत साईनाथ पवार, कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड अशा प्रमुख नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून आपापल्या परिसरात जोरदार फलकबाजी करीत शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे रवींद्र फाटक यांच्या शिवसेना प्रवेशाला पक्षातील एका मोठय़ा गटाकडून अगदी सुरुवातीपासून विरोध आहे. फाटक समर्थकांनी वाढदिवसाचे निमित्त साधून ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात जोरदार फलकबाजी केली. या फलकांवर त्यांचा उल्लेख अनेक ठिकाणी बॉस असा करण्यात आला. त्यामुळे एकनाथ िशदे यांचे काही समर्थकही या फलकबाजीविरोधात दबक्या सुरात नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
शिवसेनेचे डोंबिवली परिसराचे माजी शहरप्रमुख सदा थरवळ यांनी या परिसरातील काही शिवसैनिकांनी एकनाथ िशदे यांची भेट घेतल्याचे मान्य केले.