कोणत्याही एका पक्षाच्या पारड्यात राज्यातील मतदारांनी बहुमताचा कौल न दिल्यामुळे आत्ता सत्तास्थापनेसाठी पुढील पर्याय उपलब्ध आहेत…
पर्याय १
गेल्या २५ वर्षांपासूनचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सोबत घेऊनच भाजपला सत्ता स्थापन करावी लागेल. निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यामुळे हो दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले होते. दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या नेत्यांवर घणाघाती टीकाही केली होती. मात्र, मतदारांनी दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र यावे, असाच कौल दिला आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन करू शकतात. अर्थात आता एकत्र येण्यासाठी या दोन्ही पक्षांमध्ये पुढाकार कोण घेणार, हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.
पर्याय २
राज्यात सत्तास्थापन करण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस महत्त्वाची भूमिका निभावेल, असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यामुळे भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी मदत करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा दिला तर भाजपची एकहाती सत्ता येणे शक्य आहे. मात्र, निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसवर भाजपने जोरदार हल्ला चढविला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तोफ डागली होती. त्यांनी बारामतीमध्ये सभा घेऊन तिथे पवार काका-पुतण्यांवर शाब्दिक हल्ला चढविला होता. त्यामुळे भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा स्वीकारणार का, हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.
पर्यात ३
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन सत्तास्थापन करू शकतात किंवा सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेनेला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी बाहेरून पाठिंबा देऊ शकते. हा पर्याय राजकीयदृष्ट्या थोडा अवघड असला, तरी केवळ भाजपला विरोध करण्यासाठी याही पर्यायावर विचार केला जाऊ शकतो. मात्र, शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा स्वीकारणार का, हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.
पर्याय ४
राज्यात २५ पेक्षा जास्त जागांवर अपक्ष विजयी झाल्यास ते सुद्धा भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंबा देऊ शकतात. मात्र, यामध्ये पाठिंब्याच्या बदल्यात अपक्षांना सत्तेमध्ये वाटा द्यावा लागेल किंवा इतर ठिकाणी त्यांची वर्णी लागेल, त्यास भाजप तयार होईल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.