लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या यशामध्ये सहकारी पक्षांचाही महत्वपूर्ण वाटा असल्याचे प्रतिपादन करीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भाजपला शिवसेनेची ताकद दाखविण्याचा प्रयत्न करीत जोरदार टोला लगावला. काही राज्यांमध्ये मोदी यांची लाट चालली नाही. आम्ही जर बदनाम असतो, तर महाराष्ट्रात ही लाट आली असती का, असा तिखट प्रश्न उपस्थित करीत हल्ला चढविला. देशात नरेंद्र मोदींचे नेतृत्व पुढे केल्याने यश मिळाले, त्यामुळे महाराष्ट्रातही मतदार नेतृत्वाचा चेहरा पाहूनच मतदान करतील, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्रीपदासाठीचा उमेदवार महायुतीने घोषित करावा, असेच सूचित केले.
ठाकरे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना शनिवारी राजकीय घडामोडींवर आक्रमकपणे भाष्य करीत भाजपवर अप्रत्यक्ष टोलेबाजी केली. भाजपशी युतीबाबत मोठा भाऊ-लहान भाऊ असा माझा विचार नाही. जागावाटपाच्या मुद्दय़ावर चर्चा सुरु आहे. मुंबईला लाटांची भीती नाही. आम्ही अनेक उंच लाटा पाहिल्या. समुद्र आमच्या जवळ आहे, असे ठाकरे यांनी सुनावले. देशाला बदल हवा होता. देशाला खंबीर नेतृत्व देणारा चेहरा हवा होता. नरेंद्र मोदी  यांचे नाव पुढे आले आणि यश मिळाले. आता महाराष्ट्रातही तीच परिस्थिती असून लोकांना चेहरा हवा आहे. जर लोकांना उद्धव ठाकरे हवे असतील आणि विश्वास वाटत असेल, तर ही चांगली बाब असल्याचे ठाकरे म्हणाले. भाजपला चेहरा बदलण्याची इच्छा असल्याचे मला वाटत नाही, कारण लोकांनी निर्णय घ्यायचा आहे. ज्यांना नेतृत्वाचा चेहरा बदलण्याची इच्छा असेल, त्यांनी लोकांचा आमच्यावर का विश्वास आहे, याची कारणे शोधावीत आणि मग बदलाचा विचार करावा, असे परखड बोलही ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला ऐकविले. मोदी म्हणजे काही नवाझ शरीफ नाहीत, ते आमचे शत्रू नाहीत. रालोआचे ते पंतप्रधान आहेत. त्यांचा प्रभाव महाराष्ट्रात काम करणार असेल, तर त्यात गैर काहीच नाही. पण लोकसभेत अनेक राज्यात मोदींची लाट चालली नाही. ती महाराष्ट्रात चालली, यामध्ये सहकाऱ्यांचा मोठा सहभाग असल्याचे ठाकरे यांनी सुनावले. मी मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पहात नाही किंवा ती खुर्ची मिळविण्यासाठी माझी धडपड नाही. पण मी जबाबदारीपासून पळही काढणार नाही आणि महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवीन, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.