जनतेचे सरकार स्थापन करणार आणि १८० आमदार घेऊन दर्शनाला येणार, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्ला येथे सांगितल्याने शिवसेना आता अटींवर ठाम न राहता सरकारमध्ये सहभागी होईल, असे संकेत मिळत आहेत. उपमुख्यमंत्रीपद आणि विश्वासदर्शक ठरावाआधीच मंत्र्यांचा शपथविधी या शिवसेनेच्या आग्रहाबाबत भाजप अनुकूल असल्याचे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले.
विश्वासदर्शक ठरावाआधी मंत्र्यांचा शपथविधी झाला, तरच सरकारला पाठिंबा देण्याची शिवसेनेची भूमिका आहे, नाहीतर विरोधी पक्षात बसण्याची त्यांची तयारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार टिकवू नये, असे भाजप नेत्यांनी ठरविले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जाहीर केले आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या मागण्या पूर्ण केल्याखेरीज भाजपला सरकार टिकविणे कठीण होईल.
विश्वासदर्शक ठरावाआधी काय किंवा नंतर काय, शिवसेनेला जर सत्तेत सहभागी करुन घ्यायचेच आहे, तर तो वाद निष्कारण का ताणायचा, असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. त्यामुळे ७ किंवा ८ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकेल, असे शिवसेना नेत्यांना वाटत आहे. मात्र आधी पाठिंबा व नंतरच शिवसेनेला मंत्रीपदे यावर भाजप ठाम असल्याचे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले.