News Flash

शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवून दाखवतोच – उद्धव ठाकरे

मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने युती तोडली, असे जर तुम्हाला वाटत असेल, तर मग तुम्ही जागा कशासाठी वाढवून मागत होता. मंत्रालयात जाऊन सागरगोटे खेळण्यासाठी का,

| September 27, 2014 08:55 am

मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने युती तोडली, असे जर तुम्हाला वाटत असेल, तर मग तुम्ही जागा कशासाठी वाढवून मागत होता. मंत्रालयात जाऊन सागरगोटे खेळण्यासाठी का, असा खोचक प्रश्न भारतीय जनता पक्षाला विचारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवून दाखवतोच, असे जाहीर आव्हान शनिवारी मुंबईमधील सभेत दिले. लाट कशाला म्हणतात, हे शिवसैनिक दाखवून देतील, असाही एल्गार त्यांनी दिला.
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी महालक्ष्मी रेसकोर्सवरील जाहीरसभेने झाला. शिवसेनेशी असलेली युती भाजपने तोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे कोणतेही भाष्य केले नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरे या सभेमध्ये काय बोलतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. अपेक्षेप्रमाणे या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कठोर शब्दांत प्रहार केला.
युती तुटल्याबद्दल मी राज्याची माफी मागतो. युती टिकण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, युती टिकवण्यासाठी आम्ही आधीच १८-१९ जागा सोडून दिल्या होत्या. पण कोणताही पक्ष स्वतःच्या ३०-३५ जागा सोडणे अशक्य आहे. शिवसेना म्हणजे जागांचे गोडाऊन नाही. कोणी मागितल्या की त्याला जागा द्यायला. भाजपने शिवसेनेशी केवळ राजकीय युती तोडलेली नाही. तर हिंदूत्वाचे नातेही तोडलेले आहे, असेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपला साथ दिली म्हणून राज्यात दोघांचे ४२ खासदार निवडून आले, याची आठवण करून देऊन उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी आपला कोणताही वाद नाही, असे सांगितले. लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी मोदींना साथ दिली होती. तरी आता तुम्ही आम्हाला लाथ मारणार असाल, तर छत्रपतींची साथ कुणाला असेल, हे तुम्हाला दाखवून देतो, असेही त्यांनी सुनावले.
शिवसेनेकडे असलेल्या भुसावळ, गंगापूर या जागांवर भाजप दावा सांगत होता. त्यांच्याकडे या जागांवर लढण्यासाठी उमेदवारही नसताना बाहेरून आलेल्या नेत्यांसाठी शिवसेनेच्या कोट्यातील जागा मागण्याचे काम ते करत होते, असा आरोप करून उद्धव ठाकरे यांनी आपण कधीही भाजपच्या कोट्यातील जागांवर निवडणूक लढण्यासाठी कोणत्याही नेत्याला पक्षात घेतले नाही, असे स्पष्ट केले.
मुंडे घराण्याविरोधात उमेदवार नाही
गोपीनाथ मुंडे यांचे आमच्या परिवाराशी खूप चांगले संबंध होते. पंकजा मुंडे या मला बहिणीसारख्या आहेत. शिवसेना त्यांच्याविरोधात निवडणूक लढविणार नाही. त्यामुळे आपण यावेळी पंकजा मुंडे आणि प्रीतम खाडे यांच्याविरोधात उमेदवार दिलेला नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
सत्ता मिळाल्यास राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात लढू
निवडणुकीनंतर जर शिवसेनेला बहुमत मिळाले, तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात ते सांगतील तेथून लढण्यास आपण तयार आहोत, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
…तर २८८ जागा भाजपला देईन
पाकव्याप्त भूभाग भारताच्या ताब्यात आणून दाखवा आणि कर्नाटकने व्यापलेली मराठी माणसाची जागा त्याला परत मिळवून द्या, मग मी शिवसेनेच्या २८८ जागा भाजपला द्यायला तयार आहे, असेही जाहीर आव्हान यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले.
रामदास आठवलेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर
रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी शिवसेनेसोबत यावे, त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात येईल, अशीही ऑफर उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 8:55 am

Web Title: uddhav thackeray disclose resigns behind break in shivsena bjp alliance
टॅग : Uddhav Thackeray
Next Stories
1 रामदास आठवले भाजपसोबतच!
2 रामदास आठवले भाजपसोबत; केंद्रात मंत्रिपदाचे आश्वासन
3 ठाण्यात शिवसेनेला धक्का; अनंत तरे अपक्ष लढणार
Just Now!
X