विधानभवनावर भगवा फडकू दे, असे साकडे आई तुळजाभवानीसमोर घातल्याचे सांगून महायुतीची बोलणी सुरूआहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुळजाभवानी दर्शनानंतर पत्रकारांना दिली. अत्यंत धावपळीत तुळजाभवानी दर्शनाशिवाय ठाकरे यांनी कोणतेही राजकीय भाष्य केले नाही.
विमानाने आगमन झाल्यानंतर दुपारी सव्वादोन वाजता ठाकरे मंदिरात आले. त्यांच्यासमवेत पत्नी रश्मी, पुत्र आदित्य यांच्यासह सेनेचे संपर्कप्रमुख विश्वनाथ नेरुरकर, खासदार रवींद्र गायकवाड, आमदार ओम राजेिनबाळकर, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामल पवार, सोलापूर महिला आघाडीप्रमुख अस्मिता गायकवाड आदी उपस्थित होते. मंदिरात उद्धव ठाकरे यांनी साडीचोळी व फळांनी भवानीमातेची ओटी भरली. पूजाविधी व आरती केली.