महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाकडे (भाजप) एकही आश्वासक चेहरा नसल्यामुळेच नरेंद्र मोदींना विधानसभेच्या प्रचारात उतरावे लागल्याची टीका शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ते शनिवारी अकोल्यातील जाहीर प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपने दिल्लीत सत्ता आणण्यासाठी शिवसेनेचा वापर केल्याचा आरोप केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान राज्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्याचे ठरले होते. त्यावेळी केंद्रात भाजपची सत्ता आणण्यासाठी शिवसेनेने मेहनत घेतली होती. मात्र, आता सत्ता आल्यानंतर भाजपला आपल्या आश्वासनांचा विसर पडल्याचे त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना केवळ मते मागू नका, त्यापेक्षा राज्यातील शेतकऱ्यांची कर्जे माफ करा, असे आवाहन केले आहे.