नाथाभाऊला भाऊ मानून आपला मानला आणि तोच लाथा मारायला निघाला, अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यावर तोफ डागली. युती तुटण्यास खडसे हेच जबाबदार असल्याचे सांगत ठाकरे यांनी त्यांची मुजोरी, माज व मस्ती वाढल्याचा आरोप केला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी खडसे निवडणूक लढवत असलेल्या मुक्ताईनगर येथे उध्दव यांनी सभा घेऊन शक्ती प्रदर्शन केले.
२५ वर्षांपासून असलेली युती तोडण्यास नाथाभाऊच जबाबदार आहेत. स्वत:च्या मतदार संघाचा त्यांनी विकास केला नाही आणि मुख्यमंत्री होण्याची स्वप्न बघतात, असा टोलाही उध्दव यांनी लगावला. मुलाच्या आत्महत्येचे खापर ते शिवसेनेवर फोडतात, मग संदीप पाटील या पंचायत समिती सदस्याच्या मृत्यू प्रकरणी गप्प का बसतात असा प्रश्न करून खडसेंनी तापी पतपेढीत झालेल्या अपहार प्रकरणी ठेवीदारांना वाऱ्यावर सोडले, असा आरोप उध्दव यांनी केला. आझाद मैदानावर उपवर मुली ठेवी परत मिळवण्यासाठी उपोषण करतात, त्यावेळी विरोधी पक्षनेता म्हणून खडसे गप्प कसे बसले. मुक्ताईनगरमध्ये पाणी, शाळा, रस्ते, वीज असे प्रश्न प्रलंबित आहेत असेही त्यांनी सांगितले. भाजपमध्ये एकही माणूस मुख्यमंत्री होण्याच्या लायकीचा आहे का, असा प्रश्नही त्यांनी केला. भ्रष्ट मंत्र्यांना भाजपमध्ये प्रवेश देणाऱ्यांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून विधानसभा बंद पाडणाऱ्या खडसेंनी अशा लोकांना उमेदवारी कशी दिली, गंभीर गुन्हे दाखल असलेल्या शिवाजी कर्डीले यांच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान कसे गेले, असे प्रश्न त्यांनी जळगाव येथील सभेत उपस्थित केले. खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या पद्मसिंह पाटील यांना जामीन मिळतो, मग घरकुल घोटाळ्यातील सुरेश जैन यांच्या साठीच वेगळा न्याय का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.