News Flash

जळगावमध्ये दोन कोटी जप्त

मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसे रोकड सापडण्याचे प्रकार वाढत आहेत. जळगावच्या सहा तालुक्यांत तब्बल दोन कोटी रुपयांची रोकड भरारी पथकाने जप्त केली.

| October 12, 2014 03:41 am

मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसे रोकड सापडण्याचे प्रकार वाढत आहेत. जळगावच्या सहा तालुक्यांत तब्बल दोन कोटी रुपयांची रोकड भरारी पथकाने जप्त केली. फैजपूर येथे पिंपरुड फाटय़ाजवळ मोटारीत ७० लाखाची रोकड आढळून आली. ही रक्कम भुसावळच्या आयडीबीआय बँकेतून सावदा येथील पंजाब नॅशनल बँकेत जात असल्याची खात्री पटल्यानंतर ती बँकेच्या ताब्यात देण्यात आली.
 अमळनेर येथे रात्री एकच्या सुमारास एका हॉटेलमध्ये निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने ८० लाख रुपयांची रक्कम जप्त केली. विप्रो कंपनी रस्त्यावरील या हॉटेलमध्ये दोन व्यक्ती मोठी रक्कम घेऊन थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. यावेळी जगदीश मधुकर चौधरी व योगेश भिका चौधरी (रा. नंदुरबार) यांच्याकडे ८० लाख रुपये आढळून आले. वरणगाव शहरात बोदवड रस्त्यावरील नाकाबंदीत ७७ हजार रुपयांची रोकड पकडली. विजय पाटील यांच्याकडे ही रक्कम आढळून आली. शेती खरेदी करण्यासाठी ते जात असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत पुढे आली आहे. भुसावळ येथे जामनेर रस्त्यावरील हॉटेलमध्ये मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास पाच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. चोपडा तालुक्यातील वर्डी फाटय़ाजवळ भरारी पथकाने ५० लाख रुपयांची रोकड जप्त केली. ही रक्कम एका बँकेत नेली जात असल्याचे सांगण्यात आले.
नाशिकमध्ये सव्वा चार लाखाच्या बनावट नोटा हस्तगत
शहरातील इंदिरानगर परिसरात सुमारे सव्वा चार लाख रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोघा संशयितांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या बनावट नोटांचा वापर निवडणुकीत केला जाणार होता काय, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. निवडणुकीच्या कोलाहलात शहरातील इंदिरानगर येथील ‘जॉगिंग ट्रॅक’वर १०० रुपयांच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या. या ठिकाणी ज्ञानेश्वर सीताराम पाटील आणि जावेद अब्दुल कादिर मणियार हे सायंकाळच्या सुमारास संशयास्पदपणे फिरत होते. या बाबतची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक तीनच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ४ लाख २० हजार रुपयांच्या बनावट नोटांचे बंडल आढळून आले. बनावट नोटांचा मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी वापर केला जाणार होता काय, या दृष्टीने छाननी करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2014 3:41 am

Web Title: unaccounted 2 crore seized in jalgaon
Next Stories
1 मराठीने केला कानडी भ्रतार!
2 मुंडेंच्या अपघाती मृत्यूची पुन्हा चौकशी करा – ठाकरे
3 शरद पवार पुन्हा संघावर घसरले
Just Now!
X