मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात शिवसेनेने शिक्षणसम्राट अजिंक्य पाटील यांना कराड दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. पाटील यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांची भेट घेतली व शिवसेनेत प्रवेश केला. अजिंक्य पाटील हे जुने काँग्रेस नेते व राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे चिरंजीव आहेत.
मुख्यमंत्री चव्हाण यांना पराभूत करण्यासाठी शिवसेनेनेही कंबर कसली असून भाजपने अतुल भोसले यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेस नेते विलासकाका उंडाळकर यांनीही मुख्यमंत्र्यांविरोधात दंड थोपटले असून अपक्ष म्हणून लढण्याची तयारी केली आहे. मातब्बर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक रंगतदार होणार आहे.
उंडाळकर समर्थकांचे राजीनामे उंडाळकर निवडणुकीच्या रिंगणातच असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. उंडाळकरांची राष्ट्रवादी काँग्रेसशी दिलजमाई झाल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. आमदार उंडाळकरांची उमेदवारी डावलून कराड दक्षिणेतील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्यायच केला गेला आहे. क्रियाशील कार्यकर्ते काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचे राजीनामे देत असल्याचे निवेदन जगन्नाथराव मोहिते यांनी माणिकराव ठाकरे यांना पाठवले आहे.