विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच रंग चढला आहे. राज्यभर सर्वच पक्षांच्या पक्षप्रमुखांच्या सभा गाजत आहेत. नेत्यांनी केलेली विकासकामे आणि विरोधकांवर टीका यामुळे लोकांचे चांगलेच प्रबोधन आणि साथीने मनोरंजनही होत आहे. मतदानाला अवघा एक आठवडा शिल्लक असताना एका नेत्याच्या दररोज तीन ते चार सभा होत आहेत. त्यामुळे या धावपळीत प्रत्येक ठिकाणचे संदर्भ लक्षात ठेवणे थोडे जिकरीचे असते. परंतु एखादा नेता आपल्या पक्षाचे चिन्हच विसरत असेल तर त्याला काय म्हणावे. परंतु ही किमया साधली आहे चक्क मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी. निलंगा मतदारसंघातील येथील मनसेचे उमेदवार अभय साळुंखे यांच्या प्रचारसभेत बोलताना राज ठाकरे यांनी चक्क धनुष्यबाणाला मत द्या असे आवाहन मतदारांना केले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी लगेचच स्वत:ला सावरत इंजिनाचा उल्लेख केला. पण म्हणतात धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून बाहेर पडलेला शब्द मागे घेता येत नाही, तसा तो प्रसारमाध्यमांनी कॅमेराबध्द केला आणि राज ठाकरेंची चांगलीच नाचक्की झाली. आता सोशल मिडियावरून यावर चांगलीच चर्चा रंगली असून निवडणुकीनंतर मनसेचे इंजिन धनुष्यबाणाची सोबत करणार का, अशीही शंका घेतली जात आहे.