मराठवाडय़ातील ४६ मतदारसंघांत काही किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मंगळवारी रात्रीपासून पैसे वाटल्याच्या तक्रारी अनेक मतदारसंघांत होत्या. उस्मानाबाद मतदारसंघातील कळंब तालुक्यात एका केंद्रासमोर उघडपणे पैसे वाटल्याचा प्रकार समोर आला. नांदेडमध्येही पैसेवाटपावर वाद झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन शिवसैनिक जखमी झाले.
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात मंगळवारी रात्री शिवसेनेचे ३ कार्यकर्ते पैसेवाटप करीत असल्याची तक्रार करण्यात आली. त्यांच्या मोटारीतून ५५ हजार रुपये जप्त करण्यात आले. या वेळी तिघांना अटक करण्यात आली. सायंकाळी ‘एमआयएम’चे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर दगडफेक करण्याचा किरकोळ प्रकार वगळता शहरातील तीनही मतदारसंघांत शांततेत मतदान झाले. वादग्रस्त ठरलेल्या परभणी जिल्ह्य़ात किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत झाले. पाथरी येथे काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले. या वेळी हस्तक्षेप करणारा पोलीस कर्मचारी जखमी झाला. हिंगोली जिल्ह्य़ातही मंगळवारी रात्री नारायणनगर परिसरात प्रलोभन दाखविण्याच्या आरोपावरून तिघांना अटक झाली. त्यांच्याकडून १२ हजार ५४० रुपये जप्त करण्यात आले. जालन्यात मतदान शांततेत झाले. अंबड तालुक्यातील देशगव्हाण येथे रस्ता व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याने ९४६ मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला.  बीडमध्ये सरासरी ६५ ते ७० टक्के मतदान झाले. येथे लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभेच्या सहा जागांसाठी मतदान झाले.