व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाएबल पेपर ऑडिट ट्रेल) यंत्रामुळे मतदारांना यंदा प्रथमच आपण दिलेले मत पसंतीच्या उमेदवाराला पडले गेले आहे का, याबद्दल खात्री मिळत होती. या यंत्राच्या तंत्राने नगरकर खूश झाले. अनेकांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केले. हे यंत्र जोडले गेलेल्या राज्यातील निवडक दहा मतदारसंघांमध्ये नगर शहर मतदारसंघाचा समावेश असल्याने या निवडणुकीत हे यंत्र हेच नगरमध्ये वेगळेपण ठरले.
प्रथमच जोडले गेलेले हे यंत्र पाहण्यातील उत्सुकता, चिन्हाची चिठ्ठी बंद बॉक्समध्ये पडण्यासाठी लागणारा वेळ यामुळे मतदानासाठी लागणाऱ्या वेळेत काहीशी वाढ झाली, त्यातून विलंब होऊन मतदारांच्या रांगा लागत असल्याचे मत काही निवडणूक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. मात्र एकुणात व्हीव्हीपॅटचे आकर्षण होतेच. मूळ ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन) यंत्रावर मत दिल्यानंतर सात सेकंदांच्या आत त्याला जोडूनच ठेवण्यात आलेल्या व्हीव्हीपॅट यंत्राच्या खिडकीत आपण कोणाला मत दिले, याची चिठ्ठी दिसत होती. त्याने मतदान बरोबर झाल्याची खातरजमा झाली की चिठ्ठी या यंत्रातच नंतर खाली पडते.
निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच व्हीव्हीपॅट प्रणालीचा प्रायोगिक तत्त्वावर वापर केला. राज्यातील दहा मतदारसंघात मूळ यंत्राला जोडून ही यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. या दहा मतदारसंघांत नगर शहर मतदारसंघाचा समावेश होता. जिल्हय़ात केवळ नगरलाच ही यंत्रे देण्यात आली होती. त्याबाबत प्रशासनाने मोठी जागृतीही केली. त्यामुळे त्याबद्दल नगरकरांमध्ये त्याचे आकर्षण होते, कुतूहलही होते. प्रत्यक्ष मतदानातही ते जाणवले. मत दिले जाते एका उमेदवाराला आणि त्याची नोंद होते, दुसऱ्याच उमेदवाराच्या नावावर, अशा तक्रारी मागच्या काही निवडणुकांत आल्याने ही नवी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. नगर शहर मतदारसंघात २६६ मतदानकेंद्रे आहेत. त्यासाठी ५०० यंत्रे कार्यान्वित करण्यात आली होती. त्या सर्वाना व्हीव्हीपॅट यंत्र जोडण्यात आले होते. त्यासाठी एक स्वतंत्र कर्मचारीही नियुक्त करण्यात आला होता. मतदान केल्यानंतर सात सेकंदांत मतदाराला आपल्या मताची खात्री होते. त्यात तफावत आढळल्यास त्याला येथील विहित नमुन्यातील अर्ज भरून अशा मतदाराचे परत चाचणी मतदान घेण्यात येते. त्यात खातरजमा करण्यात येणार आहे. मोजणीच्या वेळी चाचणीचे एक मतदान एकूण मतदानातून वजा करण्यात येणार आहे. मतदाराची तक्रार खोटी ठरली, तर मात्र त्याला दंडात्मक शिक्षेचीही तरतूद करण्यात आली असून, नियम १७७ अन्वये त्याच्यावर ही कारवाई करण्यात येईल. नगर शहरात दुपापर्यंत असा कोणताच प्रकार झाला नव्हता, त्यानंतरचा तपशील सायंकाळी उशिरापर्यंत मिळू शकला नाही. मतमोजणी व निकालपत्रामध्ये मतांची घोषणा झाल्यानंतर या प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या कागदी चिठ्ठय़ांची मोजणी करण्याची मागणी करू शकतो.