विधानसभा निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र दाखल करताना पाच हजार चारशेऐंशी रुपयांची चिल्लर अनामत रक्कम म्हणून आणणाऱया रामदास जाधव यांचा अर्ज सोमवारी छाननी प्रक्रियेवेळी बाद ठरविण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी हा निर्णय घेतला.
विधानसभा निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शनिवारी रामदास जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगितले. त्या दिवशी प्रमुख उमेदवारांची या कार्यालयात गर्दी होती. यावेळी रामदास जाधव यांनी पन्नास पैसे , एक, दोन , पाच रुपयांची नाणी दुधाच्या किटल्या भरून आणली होती. हे पैसे मला लोकांनी निवडणुकीला अनामत रक्कम भरण्यासाठी दिले आहेत. हे किती पैसे आहेत ते मला माहिती नाही. तुम्ही मोजा. असे त्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगितले. शेवटची काही मिनिटे अगोदर त्यांनी आपला अर्ज दाखल केला. मी सकाळपासून आलो आहे. तुम्ही मला आत का घेतले नाही. माझे काम कधीच झाले असते, असे त्यांनी सांगितले. त्रास देण्याच्या उद्देशने तो आला असल्याचे निदर्शनास आल्यानंतरही व निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्यास त्यापासून परावृत्त करता येत नाही म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी रवी खेबूडकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वाईचे तहसीलदार सदाशिव पददुणे, खंडाळ्याचे तळपे व महाबळेश्वरचे अतुल म्हेत्रे यांनी परिस्थिती संयमाने हाताळून त्याचा अर्ज दाखल करून घेतला. चिल्लर मोजायला महसूल कर्मचारी बसले होते पण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना बोलाविण्यात आले. उमेदवारीची दहा हजार पैकी त्यांची पाच हजार चारशेऐंशी रुपयांची चिल्लर मोजली. उर्वरित चार हजार पाचशे वीस नोट स्वरूपात जाधव यांनी दिले. आणि हा प्रकार संपवण्यात आला. पण त्यामुळे संपूर्ण निवडणूक यंत्रणा कामाला लागल्याचे रवी खेबूडकर यांनी सांगितले.