‘या गल्लीत सुरू आहे’, ‘त्या गल्लीत उमेदवाराचा माणूस बसला आहे’ मतदान कार्ड घेऊन मध्यानरातीपर्यंत फेऱ्या मारल्या. पण, ऐकायला आल्या त्या पोलिसांच्या शिट्टय़ा. मध्यान झाली. घरात कोणी तरी येईल आणि मतदार किती म्हणून विचारेल म्हणून तलाठय़ाने दिलेला कागद उशाखाली ठेवला. मात्र कोणी फिरकलेच नाही. अवघी रात कुणाची तरी वाट पाहण्यात गेली. दिवाळीपूर्वी लक्ष्मी दर्शनाची आस अखेर आसच उरली.
कधी नव्हे ती चुरस निर्माण झाल्याने दिवाळी आनंदात जाईल या मनोराज्यात अनेक मतदार होते. चार प्रमुख पक्षांचे चार आणि बंडखोर, अपक्षांचे वेगळेच उमेदवार. त्यामुळे जिल्ह्णाात प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची भाऊगर्दी झालेली. गावच्या पंचायतीची अथवा वॉर्डाची निवडणूक असली की मतदार हा खऱ्या अर्थाने मायबाप निदान मतदानाच्या दिवसापुरता तरी ठरलेलाच. हक्काचे असेल तर दर कमी, काठावरचा असेल तर मध्यम आणि विरोधी गटाचा असेल तर दामदुप्पट पदरात पडते हा अनुभव वार्डाच्या निवडणुकीत आलेला.
शहरात अपार्टमेंट रंगकामापासून सार्वजनिक बोअरदुरुस्ती वीजबिल या मागण्या ठरलेल्या. ग्रामीण भागात केवळ सणादिवशी आठवणीत येणाऱ्या देवाला छत उभारण्याची कल्पना याच हंगामात यशस्वी होण्याची सुचिन्हे. त्यामुळे गल्लीचे एकगठ्ठा करण्याचा प्रयत्न झालेला. कधी कधी हुषार कार्यकर्ता असेल तर सगळ्या उमेदवारांकडून कमी जास्त रकमा उचललेल्या. दरवेळच्या निवडणुकीसाठी कारण मग न बांधले जाणारे देऊळ ठरलेलेच.
या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात चुरस असल्याने शेवटच्या दिवशी मोठा लाभ होणार. दिवाळीत दर्शन देणारी लक्ष्मी यंदा अगोदरच गरिबाच्या घरी पायधूळ झाडणार या आशेवर असलेल्या लोकांच्या नशिबी अखेर लक्ष्मी दर्शन घडलेच नाही. कारण गावगन्ना निर्माण झालेल्या पुढाऱ्यांनी या गरीब मतदारांचा लिलाव निवडणुकीच्या बाजारात केव्हाच केला असल्याचे रात्र जागून काढल्यानंतर लक्षात आले.
उमेदवारांची संख्या जास्त असल्याने पशाचा खेळ करताच आला नाही. कारण प्रत्येक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांचे अन्य उमेदवाराच्या कार्यकर्त्यांच्या हालचालीकडे बारीक लक्ष होते. हातात मोबाईल असल्याने पोलिसापर्यंत माहिती तत्काळ जात होती. पोलीस गाडय़ांच्या फेऱ्या वाढल्या. त्यामुळे दिवाळीपूर्वी लक्ष्मी दर्शनाची संधी यंदा हुकली.