उंदीर, मांजरापासून वाघापर्यंत आणि मावळे, अफझलखानापासून शिवरायांपर्यंत सर्वाच्या मनसोक्त संचारामुळे अटीतटीच्या बनलेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदान यंत्राच्या खजिन्यात दडलेला ‘ऐवज’ उद्या अखेर खुला होणार आहे. शिवसेना आणि भाजपची २५ वर्षांची युती संपुष्टात आल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही आघाडी मोडल्याने जवळपास तीन दशकांनंतर राज्यात युती आणि आघाडीचे निवडणुकीचे राजकारण संपुष्टात आले. या निकालाने स्वबळाचा अंदाज सर्वानाच येईल. भाजप-शिवसेनेचे बहुमताचे दावे-प्रतिदावे, काँग्रेस-राष्ट्रवादीने सुरुवातीपासूनच घेतलेला माघारीचा पवित्रा आणि मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तविलेले अंदाज यामुळे खरी लढत भाजप आणि शिवसेना यांच्यातच होणार हेही स्पष्ट झाले असून सत्तास्थापनेसाठी लागणारी जादूई आकडय़ाची मजल भाजप मारणार, की शिवसेना बाजी मारणार एवढेच कुतूहल आता बाकी आहे.
 बहुसंख्य मतदारसंघांत पंचरंगी लढती दिसत असल्या, तरी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यातच अटीतटीची लढत असून काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी स्पर्धा होईल, असेच चित्र दिसत आहे. मनसेला या निवडणुकीत पाच वर्षांपूर्वीएवढा प्रभाव टाकता आलेला नसल्याने, गेल्या निवडणुकीतील विजयाचा १३ चा आकडा तरी हा पक्ष या वेळी गाठणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपेक्षांची उडीच पन्नाशीच्या आकडय़ापर्यंत येऊन थांबली आहे.
भाजपने या निवडणुकीत पुन्हा नरेंद्र मोदी यांचीच प्रतिष्ठा पणाला लावली, तर शिवसेनेचा प्रचार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकहाती सांभाळला. काँग्रेसमध्ये तर उत्साहाचाच अभाव सुरुवातीपासूनच दाटून राहिलेला दिसत होता. त्याही स्थितीत, राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील काही मतदारसंघांत प्रचार सभा घेतल्या; पण त्याचे पडसाद राज्यात फारसे उमटलेच नाहीत. काँग्रेसमध्ये ऐन वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा धुसफुस सुरू झाली असून, आता पराभवाचे खापर चव्हाण यांच्याच माथ्यावर फोडण्याची सामूहिक तयारी सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.
मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजप हाच सर्वात मोठा पक्ष राहील, असे अंदाज वर्तविले गेल्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीला उधाण आले आहे. ‘दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र’ अशी घोषणा देऊन या पदासाठी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांनी अगोदरच दावा दाखल केला असला, तरी निकालानंतरच्या परिस्थितीनुसार त्यामध्ये नव्या किंवा अनपेक्षित नावांचाही विचार होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात परतण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी जुळवाजुळवीची अपरिहार्यता म्हणून त्यांच्या नावाची चर्चा असतानाच, विनोद तावडे, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे आदी नेतेही मुख्यमंत्रिपदासाठी सरसावल्याचे दिसत आहे.
शिवसेनेने बहुमताचा दावा केला असला, तरी चाचण्यांचे अंदाज पाहता या पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापन करणे फारसे सोपे नाही, हे स्पष्ट झाले असून निकालानंतरच्या आकडय़ांची गणिते शिवसेनेच्या नव्या समीकरणांची नांदी ठरतील, असे दिसते. पंचवीस वर्षांची सोबत असलेला भाजप हा सेनेचा नैसर्गिक मित्र असल्याने, बहुमतासाठी दोघाही पक्षांना आघाडीची गरज भासली, तर सेना-भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात असे आडाखे बांधले जात आहेत, मात्र प्रचारादरम्यान टोकाच्या कडवटपणे केलेल्या टीकेमुळे भाजपने सेनेची साथ झिडकारली, तर राष्ट्रवादी, मनसे व अन्य लहान पक्षांची मोट बांधून तिसरी प्रादेशिक आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नांना वेग येईल, अशीही चर्चा आहे.