शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला शिवसेनेसोबत राहण्यास सांगितले आहे. मात्र, उद्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करूनच रिपब्लिकन पक्ष कोणासोबत जायचे, याचा निर्णय घेईल, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
भाजपने गुरुवारी शिवसेनेसोबतची युती तोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्याचवेळी महायुतीतील स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासप आणि शिवसंग्राम संघटना यांनी भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्ष कोणासोबत जाणार, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. रामदास आठवले यांनी आपण कोणासोबत जायचे, याचा निर्णय अद्याप घेतलेला नसल्याचे पत्रकारांना सांगितले. शिवसेनेने त्यांच्यासोबत राहण्याची मागणी केली आहे. मात्र, भाजपच्या नेत्याशी चर्चा करून शुक्रवारी आपण निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.