पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस पक्षाला मोठय़ा प्रमाणावर गळती लागली असल्याने त्याला आळा घालण्यासाठी राज्यातील आणि केंद्रातील ज्येष्ठ नेत्यांनी त्याबाबत गंभीरपणे आत्मचिंतन करावे, असे आवाहन पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केले आहे.
पक्षाला मोठय़ा प्रमाणावर गळती लागणे ही चिंतेची बाब असल्याने त्याबाबत गांभीर्याने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. विशेषत: अखिल भारतीय काँग्रेस समिती आणि प्रदेश काँग्रेस समितीने एकत्रितपणे चिंतन करावयास हवे, असे मत पक्षाचे ज्येष्ठ नेते मानस भुनिया यांनी व्यक्त केले आहे.
राज्यातील काँग्रेस पक्षाच्या स्थितीचा आढावा घेण्याची जबाबदारी भुनिया यांच्यावर सोपविण्यात आली होती. भुनिया यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची माहिती दिली.
गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ४२ उमेदवार निवडून आले होते, त्यापैकी नऊ जणांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचप्रमाणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौमिक हुसेन यांनीही तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी युवकांना महत्त्व देत असतानाही अनेक तरुण नेते पक्षाकडे का पाठ फिरवीत आहेत, असा सवालही भुनिया यांनी केला. प्रदेशाध्यक्ष अधिर चौधरी यांनीही पक्षाला गळती लागली असल्याचे या वेळी मान्य केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 6, 2014 3:46 am