सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूर जिल्ह्य़ात आज उत्साहात मतदान पार पडले. मतदानासाठी अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. या चारही जिल्ह्य़ात सायंकाळीपर्यंत मतदानाची मिळालेली अंदाजे टक्केवारी ही ६५ टक्क्य़ांहून अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोल्हापुरात तर हा आकडा ७५ टक्क्य़ांच्या घरात गेला आहे. चारही जिल्ह्य़ात मतदानावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, डॉ. पतंगराव कदम, आर. आर. पाटील, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, सतेज पाटील, प्रणिती शिंदे आदी महत्त्वाचे उमेदवार त्यांचे राजकीय भवितव्य या चार जिल्ह्य़ातील मतदारसंघातून आजमावत आहेत. यातील सातारा जिल्ह्य़ातील ‘कराड दक्षिण’ या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले होते. या मतदारसंघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विलासकाका उंडाळकर यांच्यात प्रामुख्याने लढत होत आहे. या मतदारसंघात आज अत्यंत उत्साहात ७६ टक्के मतदान झाले. जिल्ह्य़ातील अन्य मतदारसंघांच्या तुलनेत इथे सर्वाधिक मतदान झाले आहे. जिल्ह्य़ातील अन्य सात मतदारसंघात अंदाजे सरासरी ६३ टक्के मतदान झाल्याची माहिती देण्यात आली.
बडय़ा नेत्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीतही सर्व मतदारसंघात सरासरी ६५ टक्के मतदान झाले. काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, आर. आर. पाटील यांचे राजकीय भवितव्य आणि भाजपाचे खा. संजयकाका यांची राजकीय ताकद ठरविणारी ही मतदान प्रक्रिया कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडली.
सोलापूरमध्ये मतदानासाठी सकाळपासूनच सर्वत्र उत्साह दिसून येत होता. जिल्ह्य़ातील ११ मतदारसंघात सुमारे ६५ टक्क्य़ाहून अधिक मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाल्यानंतर सुरुवातीच्या तासाभरात मतदान संथपणे सुरू होते. त्यानंतर हळूहळू गती येत गेली. अक्कलकोटमध्ये घडलेल्या राजकीय पदाधिकाऱ्याच्या खुनाच्या घटनेनंतर तालुक्यात सर्वत्र तणाव होता.
कोल्हापुरात रांगा
कोल्हापूर जिल्ह्यातील १० मतदारसंघांसाठी सरासरी ७५ टक्के मतदान झाले. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांची टक्केवारी किंचित घटल्याचे सायंकाळी पाच वाजता हाती आलेल्या आकडेवारीवरुन दिसून आले. सर्वच मतदारसंघात अत्यंत चुरशीने मतदान झाले. अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.