दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये धुसफूसनाटय़ सुरू झाले असून, निवडणुकीच्या काळात आम्हाला निधी मिळाला नाही, अशी ओरड पराभूत उमेदवारांनी सुरू केली आहे. यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाच दोष दिला जात आहे.

राणेंची स्वपक्षीयांवर आगपाखड 

निधी मिळाला नाही यावरून गडबड सुरू असतानाच पक्षाच्या तिजोरीतील १० कोटी गेले कोठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पराभूत उमेदवारांच्या दिल्लीतील चकरा वाढल्या असून, बहुतेक जणांनी आम्हाला पक्षाकडून निधीच मिळाला नाही, असे निदर्शनास आणून दिले. पक्षाच्या उमेदवारांना ठराविक रक्कम देण्याचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत ठरले होते. त्याची सारी जबाबदारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली होती. पक्षाच्या अन्य नेत्यांना यापासून दूर ठेवण्यात आले होते. पराभूत उमेदवारांनी निधी मिळालाच नाही, अशी ओरड सुरू करताच चव्हाण विरोधी नेत्यांनी संधी साधत माजी मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याची खेळी सुरू केली आहे.
पक्षाच्या उमेदवारांना निधी मिळाला नाही, असा आरोपच नारायण राणे यांनी केला. पक्षाचे १० कोटी गेले कोठे हे माहित नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही या प्रकरणी मौन बाळगणे पसंत केले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेच विधीमंडळ पक्षाचे नेतेपद सोपवावे, असा दिल्लीतील मतप्रवाह
आहे. आमदारांचा मात्र त्याला सक्त विरोध आहे. या पाश्र्वभूमीवरच निधी मिळाला नाही किंवा १० कोटी गायब झाले, अशी चर्चा पसरविण्यात येत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण समर्थकांचे म्हणणे आहे.