राज्यात सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पाठिंबा घेतल्यास, शिवसेना विरोधी पक्षात बसेल, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईत केली. मुंबईतील शिवसेना भवनात पक्षाच्या आमदार आणि खासदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. याशिवाय शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले. विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागेल, यावर शिवसेनेची भूमिका अवलंबून असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सत्तेसाठी शिवसेना कोणत्याही प्रकारची लाचारी करणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, केंद्रातील सरकारमधून शिवसेना बाहेर पडणार का, याविषयी स्पष्टपणे बोलण्यास त्यांनी नकार दिला. भाजपने राज्यातील चित्र स्पष्ट केल्यानंतरच शिवसेना आपला निर्णय घेईल. राष्ट्रवादी काँग्रेससारख्या हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या संघटनेला भाजपने सोबत घेतल्यास शिवसेना विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपविरोधात मतदान करेल, असे उद्धव यांनी सांगितले. शिवसेना-भाजप ही युती सत्तेच्या राजकारणासाठी नसून, हिंदुत्वाच्या राजकारणासाठी असल्याची आठवण त्यांनी यावेळी भाजपला करून दिली. त्यामुळे वेळ आल्यास महाराष्ट्र आणि हिंदुत्वाच्या हितासाठी शिवसेना विरोधी पक्षात बसण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.