राज्यातील विधानसभा निवडणुकीत एकीकडे ‘लक्ष्मीदर्शन’ प्रचंड प्रमाणात वाढलेले असतानाच दुसरीकडे मद्याचाही महापूर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या २९ दिवसांत तब्बल दोन कोटींचे मद्य जप्त केले. आज, सोमवारपासून प्रचार बंद झाल्यानंतर मतदारांना मद्य आणि पैशांचे आमिष दाखवण्याचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता असल्याने कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.
राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने नेमलेल्या भरारी पथकांनी गेल्या २९ दिवसांत राज्यभरातून एकूण १ कोटी ९१ लाख रुपये किमतीचे १ कोटी ५८ लाख लिटर देशी आणि विदेशी मद्य जप्त केले आहे.  मद्य बनविण्यासाठी लागणारे साहित्य आणि वाहने असा मिळून एकूण ३ कोटी १४ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. एकूण ५ हजार ७४१ ठिकाणी छापे टाकण्यात आले तर ४ हजार ११० जणांवर गुन्हे दाखल करून ३ हजार ३६ जणांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या काळातील ५१ दिवसांत जवळपास १ कोटी ९९ लाख रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले होते.
दरम्यान मद्याचा महापूर रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाला आहे. राज्यात ७९ चेक पोस्ट उभारण्यात आले असून इतर आठ राज्यांना जोडणाऱ्या महाराष्ट्राच्या सर्व सीमांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून जिल्ह्य़ांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत.
रविवारचे लक्ष्मीदर्शन
*किती? : २८ लाख
*कुठे? : पवईच्या आयआयटी मार्केटजवळ एका गाडीत तब्बल १८ लाखांची रोकड, तर लालबागमध्ये  ९ लाख ९६ हजार रुपयांची रक्कम.
*बचाव : पवईची रक्कम राष्ट्रवादी उमेदवार एल. बी. सिंह यांच्यासाठी. लालबागच्या रकमेबद्दल आरोपींकडे उत्तर नाही.