19 September 2020

News Flash

वाचवण्यासाठी सरकार चालवणार नाही!

जनतेच्या प्रश्नावर सरकार पडले तरी चालेल, पण भ्रष्टाचारी नेत्यांवर कारवाई करूच. सरकार वाचवण्यासाठी मी अजिबात सरकार चालवणार नाही, असे ठाम प्रतिपादन राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र

| November 1, 2014 03:03 am

जनतेच्या प्रश्नावर सरकार पडले तरी चालेल, पण भ्रष्टाचारी नेत्यांवर कारवाई करूच. सरकार वाचवण्यासाठी मी अजिबात सरकार चालवणार नाही, असे ठाम प्रतिपादन राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या भव्यदिव्य सोहळय़ात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तडक कारभाराला सुरुवात करणारे फडणवीस यांनी ‘सह्याद्री’ वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत उद्योग, आर्थिक स्थिती, टोल, सहकार आणि राजकारण अशा मुद्यांवर स्पष्टपणे मते मांडली.
‘मी, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की’..

वानखेडे स्टेडियमवरील शाही सोहळय़ात देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे २७वे मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. त्यांच्यासोबत भाजपच्या सात कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांनाही राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शपथ दिली. या सोहळय़ानंतर दूरदर्शनच्या सह्य़ाद्री वाहिनीवर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात फडणवीस यांची मुलाखत ‘लोकसत्ता’ चे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतली. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी राजकीय आकसापोटी कोणावरही कारवाई करणार नाही, असे स्पष्ट केले. त्याचवेळी केवळ सरकार वाचवण्यासाठी सरकार चालवणार नाही, असेही ते ठामपणे म्हणाले. सिंचन क्षेत्रातील करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबत भाजपने मोठा आवाज उठविला. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या अल्पमतातील सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घ्यावा लागला, तर कारवाई करताना अडचण होईल का, असे विचारता मुख्यमंत्री म्हणाले, ‘शिवसेनेसोबत आमची बोलणी व्यवस्थित सुरू आहेत. ते बरोबर येण्याची शक्यता आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घ्यावा लागला, तरी कारवाईत कोणतीही अडचण येणार नाही. जनतेच्या तिजोरीतील पैशांचा अपहार झाल्यास संबंधितांचा कोणताही मुलाहिजा न ठेवता कारवाई करण्यास आम्ही कचरणार नाही.’
‘राज्यात टोलविषयी पारदर्शकता नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी अन्यायकारक टोलनाके आहेत. ते टोलनाके बंद केले जातील,’ असे मुख्यमंत्री म्हणाले. तर एलबीटी आणि जकात या दोन्ही गोष्टींना आपल्या सरकारचा विरोध असून महापालिका तसेच स्थानिक स्वराज संस्थांना आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी नवीन करप्रणाली आणली जाईल, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील सहकार क्षेत्राच्या पीछेहाटीबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. ‘सहकारामध्ये आर्थिक बाबीबरोबरच सामाजिक बांधणी हा महत्त्वाचा गुण आहे. त्यामुळे तो वाचलाच पाहिजे. आजारी साखर कारखाने खासगी क्षेत्राकडून अतिशय कमी किंमतीत विकत घेण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत झाले. मी गुजरातसारख्या राज्यात चौकशी केली. पण तेथे सहकारी क्षेत्रातील कारखाना खासगी व्यक्तीला विकत घेताच येत नाही. सहकारी कारखान्याकडूनच त्याचे पुनरुज्जीवन केले जाते. त्यामुळे याचा अभ्यास करून योग्य धोरण निश्चित केले जाईल,’ असे ते म्हणाले. गुजरातच्या प्रगतीकडे पाहण्यापेक्षा महाराष्ट्र गुजरातच्या पुढे कसा जाईल, यावर आपला भर असेल, असेही ते म्हणाले. वेगळय़ा विदर्भ राज्याची निर्मिती महाराष्ट्राच्या विरोधात नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळा किंवा अन्य गैरव्यवहारांची चौकशी करण्याचे आश्वासन प्रचाराच्या काळात दिले होते. त्यानुसार प्रत्येक प्रकरणांचा आढावा घेतला जाईल. जेथे काय चुकले असेल तर कारवाई झालीच पाहिजे. हे करताना व्यक्ती नव्हे तर राज्याचे हित डोळ्यासमोर ठेवले जाईल..
सरकारी कामांसाठी लोकांना चकरा मारायला लागतात. अधिकारी दाद देत नाहीत, अशा तक्रारी येतात. याबद्दल जनतेच्या मनात सरकारबद्दल रोष असतो. मंत्रिमंडळाच्या झालेल्या पहिल्याच बैठकीत सेवा हमी कायदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय तसेच निमशासकीय (महापालिका) संस्थांमध्ये विशिष्ट मर्यादेत कामे झालीच पाहिजेत, अशी नव्या कायद्यात तरतूद केली जाणार आहे. सर्वसामान्यांना यासाठी कायद्याचे अधिष्ठान मिळणार आहे.
विकास कामांवर सरकारचा भर राहणार आहे. राज्याला पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार दिला जाईल. अनेकदा पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार याचा मेळ जमत नाही. यामध्ये योग्य समन्वय राहिल याची खबरदारी घ्यावीच लागेल.

..  दिविजा सापडली!
शपथविधी सोहळा सुरू होण्याआधी मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मान्यवरांच्या स्वागतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गर्क होते, तर प्रेक्षकांच्या गर्दीत सुरक्षा यंत्रणांची वेगळीच धावपळ सुरू झाली होती. देवेंद्रांची पाच वर्षांची कन्या दिविजा कुठे गेली तेच कळत नव्हते. मुख्य मंचावरही ती नव्हती आणि कोणासोबत आहे तेही कळत नव्हते. देवेंद्र यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा गर्दीतून हजारो हात उंचावले गेले. त्यातच दिविजाचा चिमुकला हात त्यांना दिसला, आणि साऱ्यांनाच हायसे वाटले..

उद्धव आले, आणि..
देवेंद्र यांचा शपथविधी आटोपल्यानंतर अचानक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी यांचे चेहरे क्लोज सर्किट टीव्हीच्या पडद्यावर जनतेला दिसले, आणि साऱ्यांच्या नजरा विस्फारल्या. गेले काही दिवस सेना-भाजपमध्ये वाढलेल्या तणावानंतर ठाकरेंच्या उपस्थितीबाबत सर्वानाच उत्सुकता होती. शपथविधी संपल्यानंतर ठाकरे यांनी अडवाणींची भेट घेऊन त्यांना नमस्कार केला, अमित शहा यांच्याशीही त्यांची नजरानजर झाली, एकमेकांना नमस्कार करून उद्धव ठाकरे यांनी नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदनही केले..

नाना पाटेकरांसह काही व्हीआयपी परतले
ज्येष्ठ नेते नाना पाटेकर हे प्रवेशद्वाराच्या रेटारेटीत आणि गर्दीत अडकले होते. पोलिसांनी दारेही बंद केल्याने कोणालाच आत जाता येत नव्हते. त्यामुळे पाटेकर वैतागले व त्यांनी निमंत्रणपत्रिका फाडून फेकून देत ते परत फिरले. उद्योगपती अनिल अंबानी यांनाही बरीच कसरत करीत आत जावे लागले. ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हेदेखील प्रवेशद्वाराशीच अडकले होते.

विशेष अधिवेशन
राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन ११ नोव्हेंबरपासून सुरु होणार असल्याचे समजते. हे अधिवेशन तीन दिवसांचे होणार असून त्यात शेवटच्या दिवशी म्हणजे १३ नोव्हेंबरला विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल आणि अध्यक्षांची निवड होईल. अधिवेशनाची औपचारिक घोषणा शनिवारी
अपेक्षित आहे.

नवे मंत्रिमंडळ
एकनाथ खडसे

खडसे हे १९९०पासून सातत्याने विधानसभेवर निवडून येत आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य महात्मा फुले कृषी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. भाजप प्रदेश सरचिटणीस तसेच २००४ पासून अखिल भारतीय भाजप कार्यकारिणी सदस्य असलेले खडसे यांनी युती शासनाच्या काळात वित्त व नियोजन खाते, उच्च व तंत्रशिक्षण तसेच पाटबांधारे खात्याचा कार्यभार सांभाळला. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सरकारला  कोंडीत पकडले आहे.

सुधीर मुनगंटीवार
मुनगंटीवार विद्यार्थी दशेपासून अनक चळवळींमध्ये सहभागी झाले आहेत. राज्यात स्वतंत्र खनिज मंत्रालय सुरू करण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आणि त्यात त्यांनी यशही मिळवले. प्रदेश भाजपचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. युती शासनाच्या काळात मुनगंटीवार पर्यटन व ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री होते. चंद्रपूर येथून सलग पाचवेळा आमदार बनलेल्या मुनगंटीवार यांनी विधिमंडळात सर्व वैधानिक आयुधांचा अत्यंत प्रभावी वापर आजवर केला आहे.

प्रकाश मेहता
रा.स्व.संघाचे कार्यकर्ते असणाऱ्या प्रकाश मेहता यांनी घाटकोपर परिसरात अनेक सामाजिक उपक्रम राबविले. १९७५मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. सलग सहाव्यांदा आमदार म्हणून घाटकोपर पूर्वतून ते निवडून आले आहेत. युती शासनाच्या काळात गृहनिर्माण, गलिच्छ वस्ती सुधार, घरदुरुस्ती व कमाल नागरी धारणा खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. पर्यटन खात्याचे मंत्री, मुंबई उपनगर जिल्ह्य़ांचे पालकमंत्रीपदही सांभाळले आहे

विष्णू सावरा
विष्णु सवरा ठाणे जिल्’ााच्या आदिवासी समाजातील भाजपाचे प्रमुख कार्यकर्ते आहेत. बी.कॉम. झालेल्या सवरा यांनी ठाणे जिल्’ााच्या आदिवासींमध्ये भाजपाचे काम पोहोचविण्यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. राज्य भाजपच्या कार्यकारिणीवर अनेक वर्षे ते कार्यरत आहेत. राजकारणाबरोबरच ठाणे जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनांमध्ये ते कार्यरत आहेत. युती सरकारच्या अखेरच्या कालखंडात १९९९ मध्ये अल्पकाळासाठी त्यांनी आदिवासी विकास मंत्री म्हणून काम केले आहे.

विनोद तावडे
तावडे विद्यार्थी दशेपासून समाजकारणात सक्रिय आहेत. विद्यार्थी परिषदेमध्ये असताना त्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक आंदोलने आणि अभियानांचे नेतृत्व व नियोजन केले. मुंबई भाजपाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. २०११ पासून त्यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते भूषविले. बोरिवली विधानसभा मतदारसंघातून प्रथमच निवडणूक लढवताना ते विक्रमी मतांनी विजयी झाले. राजकीय कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे ते संचालक आहेत.

चंद्रकांत पाटील
विद्यार्थी दशेपासूनच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यरत असलेल्या पाटील यांनी त्याच माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस,  संघाचे कोल्हापूर विभागाचे सहकार्यवाह म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. काही काळ भाजपचे प्रदेश सरचिटणीसपदही त्यांनी भूषविले. सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष. २००८ मध्ये विधान परिषदेवर निवडून आले होते. २०१४ मध्ये ते दुसऱ्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे निकटवर्तीय.

पंकजा मुंडे-पालवे
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या असलेल्या पंकजा या सलग दुसऱ्यांना विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. बीएससी-एमबीए झालेल्या पंकजा यांनी महिला बचतगट, वैद्यनाथ सर्वागीण विकास संस्थेमार्फत शाळा, महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभारणीत मोठे योगदान दिले आहे. ऊस तोडणी कामगारांच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्ने. पं. दीनदयाळ उपाध्याय सहकारी बँकेवर संचालिका. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मराठवाडा व विदर्भात संघर्षयात्रा काढली.

दिलीप कांबळे
पुणे शहरातील व दलित समाजातील भाजपचे एक प्रमुख कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात. १९९५ मध्ये कांबळे पुण्यातील पार्वती मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले होते. युती सरकारमध्ये त्यांनी समाज कल्याण खात्याचे राज्यमंत्रीपद संभाळले होते. मतदारसंघात नवनवीन उपक्रम राबविण्यात ते नेहमीच आघाडीवर. पुणे (कँटोन्मेंट) मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवड.

विद्या ठाकूर
महिला, उत्तर भारतीय आणि सुभाष देसाई यांच्यासारख्या दिग्गजाला पराभूत करून मिळवलेली ‘जायंट कीलर’ ही ओळख हे मुख्य भांडवल. माहेर आणि सासर दोन्हीही संघ-जनसंघ व भाजपाचे आहे. विद्या ठाकूर यांनी आजवर कोणत्याही निवडणुकीत हार पत्करलेली नाही. गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील चिंचोली वॉर्डातून १९९२ मध्ये त्यांनी महापालिकेची निवडणूक लढवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2014 3:03 am

Web Title: wont work to save government fadnavis
टॅग Devendra Fadnavis
Next Stories
1 वानखेडेवर सुदिनम् तदेव!
2 याचि देही अनुभवला, ऐतिहासिक सोहळा!
3 जल्लोषाचे चौकार आणि आनंदाचे षटकार!
Just Now!
X