विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यास अवघे दोन दिवस बाकी असताना येवला मतदार संघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार निवृत्ती लहरे यांनी माघार घेत राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांना पाठिंबा दिल्याने काँग्रेसची पुरती नाचक्की झाली आहे. नाशिक जिल्हा काँग्रेसने लहरे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
आघाडीत जागा वाटपाचा घोळ सुरू असताना आपण विकासाबरोबर असल्याचे सांगत भुजबळांच्या गोटात वावरणाऱ्या लहरे यांना आघाडी तुटल्यानंतर काँग्रेसची उमेदवारी मिळाली. लहरेंना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्याबद्दल साशंकता व्यक्त केली होती. अखेर त्यांचा संशय खरा ठरला. याविषयी बोलताना लहरे यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर आपण तालुक्यात गावोगावी मतदारांच्या भेटी घेतल्या, पत्रके वाटल्याचे नमूद केले. जनतेने प्रतिसाद न दिल्याने आपला विजय होत नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले यामुळे राष्ट्रवादीला पाठिंब्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. अलीकडेच नांदगाव येथे प्रचार दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपणास चांगली लढत देण्याचा सल्ला दिला होता, असेही लहरे यांनी सांगितले. या मतदारसंघात आता राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप अशी तिरंगी लढत होणार आहे. दरम्यान, जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत सरचिटणीस सुनील आव्हाड यांनी लहरे यांना आर्थिक तडजोडीतूनच माघार घेण्यास भाग पाडण्यात आले.