राष्ट्रवादीकडे संशयाने पाहणाऱ्या अनेक काँग्रेसी नेत्यांची आघाडी तुटावी ही अनेक वर्षांंची इच्छा अखेर वास्तवात आली. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील आणि राष्ट्रवादीकडे असलेल्या मतदारसंघांतील काँग्रेस कार्यकर्ते खूश झाले. १९९९ नंतर प्रथमच, हाताचा पंजा हे चिन्ह आता राज्याच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये पोहचणार आहे.  
आघाडी तुटल्याने काँग्रेसला फारसा फायदा होणार नाही, पण तोटाही होणार नाही. अल्पसंख्याक, दलित, झोपडपट्टीवासीय ही काँग्रेसची पारंपरिक मतपेढी अलीकडच्या काळात ढळू लागली. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवातून काँग्रेस पक्ष अजूनही सावरलेला नाही. राहुल गांधी यांचे नेतृत्व सपशेल अपयशी ठरले आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून गेली दहा वर्षे त्या पक्षाने केलेल्या आक्रमक राजकारणामुळे राज्यात काँग्रेसच्या वाढीवर मर्यादा आल्या. शिवाय, काँग्रेसच्या पारंपरिक मतांच्या टक्केवारीत विभागणी झाली.
राहुल गांधींच्या हातात पक्षाची सूत्रे गेल्यापासून काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात वातावरणनिर्मिती होत गेली. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर झालेल्या विधानसभेच्या तीनपैकी दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. आता आघाडी तुटल्यामुळे, हे यश स्वबळावर कायम ठेवण्याचे काँग्रेससमोर मुख्य आव्हान आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईने गेल्या निवडणुकीत काँग्रेसला साथ दिली. ६२ जागा असलेल्या विदर्भात भाजपचे मोठे आव्हान आहे. ४६ जागा असलेल्या मराठवाडय़ात यश टिकविण्याचे आव्हान आहे. मुंबईत भाजप, शिवसेना आणि मनसेचे मतविभाजन कसे होते यावरच काँग्रेसचे यश अवलंबून असणार. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीमुळे काँग्रेसची वाढ खुंटली. तेथे राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांच्याशी सामना करावा लागणार आहे. उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार आणि धुळ्यावर काँग्रेसची मदार राहील. कोकणात किती यश मिळेल याबाबत साशंकताच आहे. आघाडी सरकारच्या विरोधातील नाराजी राष्ट्रवादी विभक्त झाल्याने नक्कीच कमी होऊ शकेल. काँग्रेससाठी तेवढीच जमेची बाजू आहे. अर्थात त्यासाठी काँग्रेसला प्रचारात राष्ट्रवादीच्या विरोधात उघडपणे भूमिका घ्यावी लागेल. राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसच्या मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप झालेले नाहीत. काँग्रेसने विकास या मुद्दय़ावर प्रचारात भर दिला आहे. गेल्या १५ वर्षांत राज्यात झालेल्या विकासाचा मुद्दा लोकांसमोर आणला आहे.  लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने काँग्रेसला साफ नाकारले होते. ही परिस्थिती बदलण्याचे मोठे आव्हान पक्षापुढे आहे. लोकसभेच्या पराभवानंतर सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले असले तरी त्यावर काँग्रेसची छाप पडलेली नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा ही पक्षासाठी जमेची बाजू असली तरी त्यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा येतात. सध्या भाजपची हवा आहे. शिवसेनेने वातावरणनिर्मिती केली आहे. राष्ट्रवादी आर्थिक आघाडीवर सरस आहे. या साऱ्यांच्या तुलनेत काँग्रेस कुठेच दिसत नाही.  २००९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सारी ‘ताकद’ पणाला लावली होती. तेव्हा चांगले यश मिळाले होते. आता तेवढी ‘ताकद’ पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे दिसत नाही. सरकारच्या विरोधात व विशेषत: काँग्रेसबद्दल सर्वसामान्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर नाराजी आहे. राष्ट्रवादी वेगळी झाल्याने ही नाराजी पुढील दोन आठवडय़ांमध्ये दूर करण्यात नेतेमंडळींना कितपत यश येते यावरच काँग्रेसचे भवितव्य ठरणार आहे.