येथे सगळे पक्ष आपापला विचार करताहेत, आपण तरी महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करू, असे विचार मनसेची ब्लू प्रिंट सादर करताना राज ठाकरे यांनी मांडले, तेव्हाच त्यांचा पक्ष स्वबळावरच विधानसभा निवडणूक लढणार हे स्पष्ट झाले होते. याआधीही वेळोवेळी राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला होता. पण काहीसा मरगळलेल्या या पक्षात आता शिवसेना-भाजप युतीचा घटस्फोट आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा काडीमोड यामुळे नवे चैतन्य निर्माण झाले आहे.
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लाटेत मनसे अक्षरश: पालापाचोळ्याप्रमाणे उडून गेला. तेव्हापासून विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यानंतरही मनसेतील चैतन्य हरपले होते. मनसेतील अनेक उमेदवार निवडणूक लढण्यास फारसे उत्सुक नव्हते. सेना-भाजपची युती राज्यात सत्तेवर येणार असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदावरून युती तुटली व आघाडीची बोट फुटली. या साऱ्याचा फायदा राज ठाकरे हे उठविल्याशिवाय राहणार नाहीत.  एकीकडे भाजपने शिवसेनेचा विश्वासघात केला असे चित्र निर्माण केले जात असताना, त्याच चित्रात मनसेचे रंग भरून वातावरण अनुकूल करून घेण्याचे आव्हान राज यांच्या मनसेला पेलावे लागणार आहे. मनसेची पक्षबांधणी कमकुवत असल्याचा तसेच अनुभवी साथीदार नसल्याचा फटका राज यांना बसणार आहे. त्यातही त्यांच्या एकखांबी तंबूवर मनसेचा सारा प्रचार अवलंबून असल्यामुळे आव्हान मोठे आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला २५ लाख मते मिळाली व १३ आमदार विजयी झाले होते.  युती झाली असती तर मनसेची अवस्था कठीण होती हे मनसेच्याच ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. युती तुटल्यानंतरही उमेदवारीवरून बंडाळी होण्याची चिन्हे आहेत. केंद्रात विश्वासाने मतदान केलेल्या मतदारांमध्ये फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे. ‘टायमिंग’ साधण्यात माहीर असलेले राज ठाकरे हे टायमिंग चुकवणार नाहीत अशी मनसेच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. तरीही, शिवसेनेसारखी तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांची भक्कम फळी पक्षाकडे नसल्याचा त्रास निश्चितच होणार आहे. सेना-मनसे आता एकत्र येणार अशीही चर्चा असली तरी ‘खंजीर आणि सूप व तेलकट वडय़ांचे’ काय होणार, हाही कळीचा मुद्दा आहे.