राज्यात आतापर्यंत १९९५चा अपवाद वगळता विधानसभेसाठी सरासरी ६० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले आहे. लोकसभेच्या वेळी देशात अन्य राज्यांमध्ये विक्रमी मतदान झाले असले तरी महाराष्ट्रात मात्र ६० टक्केच मतदान झाले होते. आघाडी किंवा युतीत झालेली फाटाफूट तसेच मतदारांमध्ये असलेला निरुत्साह यामुळे मतदानाची टक्केवारी लोकसभेच्या तुलनेत काहीशी घटेल, असा अंदाज आहे.  
महाराष्ट्रात लोकसभा किंवा विधानसभेच्या वेळी मतदानासाठी फारसा उत्साह दिसत नाही. विशेषत: शहरी भागात फारच कमी मतदान होते. यंदा मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून निवडणूक आयोगाने जनजागृती केली. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजातील विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना जाहिरातींमध्ये सहभागी करून घेतले. लोकसभेच्या वेळी देशाच्या अन्य भागांमध्ये मतदानाचे प्रमाण चांगले होते, पण राज्यात ६०.३६ टक्केच मतदान झाले होते. मुंबईत एरवी ४० टक्क्यांच्या आसपास मतदान व्हायचे. लोकसभेच्या वेळी ५० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले.
गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विरोधात मतदारांमध्ये नाराजी आहे. सत्ताबदलासाठी मतदार मोठय़ा प्रमाणावर मतदानाला बाहेर पडतात, असा अनुभव आहे. १९९५ मध्ये राज्यात विक्रमी मतदान झाले होते. लोकसभा निवडणुकीत यूपीएच्या विरोधातील नाराजी मतदानातून बाहेर पडली होती. त्याचीच पुनरावृत्ती होणार का, असा प्रश्न आहे.

१९९५ मध्ये विक्रमी मतदानाने सत्ता परिवर्तन
विधानसभेसाठी राज्यात आतापर्यंत सर्वाधिक ७१.६९ टक्के मतदान १९९५ मध्ये झाले होते. वाढीव मतदान हे प्रस्थापितांच्या विरोधात मतदान, असे प्रमाण मानले जाते. राज्याच्या स्थापनेपासून कायम सत्तेत येणाऱ्या काँग्रेसच्या विरोधात मतदान झाले होते. तेव्हा प्रथमच काँग्रेसला दुहेरी आकडाही गाठता आला नव्हता. अपक्षांच्या मदतीने शिवसेना-भाजपचे सरकार तेव्हा सत्तेत आले होते.

मतदान टक्केवारीचा इतिहास
         वर्ष           टक्के
    १९६२         ६०.३६
    १९६७         ६४.८४
    १९७२         ६०.६३
    १९७८          ६७.५९
    १९८०          ५३.३०
    १९८५        ५९.१७
    १९९०         ६२.२६
    १९९५         ७१.६९
    १९९९         ६०.९५
    २००४         ६३.४४
    २००९         ५९.५०