scorecardresearch

भाजपने दिल्लीत सत्ता स्थापन करावी

भारतीय जनता पक्षाला दिल्लीत सत्तास्थापनेचा ‘सल्ला’ देणाऱ्या माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांच्याविरोधात स्वपक्षातून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

भाजपने दिल्लीत सत्ता स्थापन करावी

भारतीय जनता पक्षाला दिल्लीत सत्तास्थापनेचा ‘सल्ला’ देणाऱ्या माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांच्याविरोधात स्वपक्षातून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अलीकडेच गांधी कुटुंबीयांचे निष्ठावान समजले जाणाऱ्या दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती. आता दीक्षित यांनीदेखील भाजपने दिल्लीत सत्ता स्थापन करावी, असे वक्तव्य केले आहे. दीक्षित यांच्या वक्तव्याशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याची सारवासारव प्रसारमाध्यम विभागाचे प्रमुख अजय माकन यांनी केली, तर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी दीक्षित यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
सत्तास्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ असल्याने भाजपने दिल्लीत सत्ता स्थापन करावी, असे वक्तव्य दीक्षित यांनी केले होते. त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. दिल्लीतील ज्येष्ठ नेते हारून युसूफ यांनी दीक्षित यांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले. कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्ता स्थापन करू दिली जाणार नाही. घोडेबाजार करून सत्ता स्थापण्याचा भाजपचा डाव आहे. दिल्लीत पुन्हा निवडणूक झाली पाहिजे. दीक्षित यांनी दिलेला सल्ला वैयक्तिक आहे. त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही; परंतु भाजपसारख्या जातीयवादी पक्षाने दिल्लीत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेसचा कडवा विरोध राहील. आम आदमी पक्षाचे नेते आशुतोष यांनी शीला दीक्षित व अमित शहा एकाच सुरात बोलत असल्याची टीका केली आहे. काँग्रेस व भाजप एकच आहेत, अशी टीका वारंवार आम आदमी पक्ष करत आला आहे. काँग्रेसचे माजी आमदार भीष्म शर्मा यांनी दीक्षित यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी थेट पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी दीक्षित यांची पाठराखण केली आहे. दीक्षित परिपक्व नेत्या आहेत. त्यांनी दिल्लीकरांच्या हितासाठी असे वक्तव्य दिले आहे. तांत्रिकदृष्टय़ा सत्तास्थापनेचा अधिकार भाजपला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह लवली म्हणाले की, दीक्षित ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांनी असे विधान करणे योग्य नाही. अर्थात त्यांचे मत वैयक्तिक आहे. पक्षाची भूमिका ठरलेली आहे.

मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-09-2014 at 02:58 IST

संबंधित बातम्या