वाढीव मतदान म्हणजे प्रस्थापितांच्या विरोधातील कौल, असे मानले जाते. त्यानुसार राज्यात झालेले ६४ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान हे भाजपच्या पथ्थ्यावर पडण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आदी विभागांमध्ये झालेल्या वाढीव मतदानामुळे भाजपच्या जागा वाढण्यास मदतच होणार आहे.
राज्यात सरासरी ६० टक्क्यांच्या आसपास मतदान होते. यंदा मतदानाची टक्केवारी वाढली. पंचरंगी लढतीमुळे कोण बाजी मारेल याचा अंदाज येत नव्हता. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा दाखविण्यात आल्या आहेत. विभागवार मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास वाढीव मतदान हे भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे.
विदर्भात भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्यत्वे लढत आहे. विदर्भात काही ठिकाणी ६५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. विदर्भात सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात नाराजीची भावना होती. लोकसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसचा पार सफाया केला होता. विदर्भात शिवसेना वा राष्ट्रवादी हे फार काही प्रबळ नाहीत. यामुळेच ६२ जागा असलेल्या विदर्भात वाढीव मतदान हे भाजपसाठी फायदेशीरच ठरणार आहे. या पट्टय़ात ४० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे. मराठवाडय़ात ४६ जागा असून, या विभागात भाजप आणि शिवसेनेतच मुख्यत्वे लढत झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी नांदेड आणि लातूर वगळता अपवादात्मक ठिकाणी स्पर्धेत होते. मराठवाडय़ात काही ठिकाणी ६५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. येथेही वाढीव मतदान भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे. ७० जागा असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये लढत होती. पश्चिम महाराष्ट्रातील वाढीव मतदान हे भाजपच्या दृष्टीने फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र शिवसेनेचा जोर राहण्याची चिन्हे आहेत. पश्चिम महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याचे भाजपच्या एका नेत्याने सांगितले.
मुंबई, ठाणे आणि कोकण या पट्टय़ांत भाजप आणि शिवसेनेतच स्पर्धा आहे. या पट्टय़ात काँग्रेस अथवा राष्ट्रवादीची पीछेहाट होण्याची चिन्हे आहेत.