कराड दक्षिणमधून उमेदवारीसाठी आपण पक्षाकडे मागणी केल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले. लोकसभेचा निकाल अपघातानेच लागला असल्याचा टोला लगावताना, दरम्यान काही राज्यात झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल बोलके असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीत विकास, लोकहिताची व तत्त्वांची भूमिका यावर चर्चा न होताच केवळ दिशाभूल करणारी वक्तव्ये व जाहिरातबाजीवर निवडणूक झाल्याची खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. केंद्रातील एनडीए व राज्यातील युतीचे सरकार पायउतार झाल्यानंतर काँग्रेस आघाडीने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. प्रगती व विकासाची गती साधली. युतीचे साडेचार वर्षांचे शासन अनुभवल्यानंतर जनतेने काँग्रेसला साथ दिली. आघाडी सरकारनेही महाराष्ट्राला सर्वच पातळय़ांवर प्रगतिपथावर ठेवताना, प्रथम क्रमांकाचे राज्य बनवले. केंद्र सरकारमधील प्रशासनाचा मला अनुभव असून, अचानक महाराष्ट्राच्या जबाबदारीवर यावे लागले. गत साडेतीन वर्षांत संपूर्ण राज्य जवळून पाहता आले. राज्यात लोकाभिमुख व विकसनशील शासन चालवण्यात यश आल्याचे समाधान आहे. आता येत्या पाच वर्षांत प्रत्येक तरुणाच्या हाताला काम अन् सक्षम असलेल्या महाराष्ट्राच्या ताकदीवर अगदी सामान्यातील सामान्य जनतेच्या सक्षमीकरणाचा आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुणवत्तेच्या पातळीवर महाराष्ट्राला आणखी भक्कम करण्याची माझी भूमिका आहे. काँग्रेसने प्रगत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती केल्याने सर्वत्र या तंत्रज्ञानाचा मोठय़ा प्रमाणात वापर होत असल्याचे त्यांनी नमूद केले.