शंभर दिवसांचा कालावधी किंवा वीज टंचाईचे संकट यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या काळात मोदी हेच लक्ष्य असतील हे अधोरेखीत केले. भाजपचा प्रभाव कमी करण्यासाठी मोदी सरकारवर तोफ डागण्याची व्यूहरचना काँग्रेसने आखली आहे.  मोदी यांचा प्रभाव आगामी विधानसभा निवडणुकीत कितपत राहील याचा अद्याप काँग्रेस नेत्यांना अंदाज आलेला नाही. राज्यातील आघाडी सरकारच्या विरोधातील नाराजी हा मुख्य मुद्दा आहे. यामुळेच विरोधकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभारावर अधिक टीका सुरू केली आहे.
आघाडीचा निर्णय होण्याची वाट न बघता काँग्रेसने प्रचाराचे रणशिंग फुंकले आणि भाजपला लक्ष्य केले. भाजप वा मोदी सरकारला लक्ष्य केल्याशिवाय मते मिळणार नाहीत याचा अंदाज आल्यानेच मुख्यमंत्री चव्हाण तसेच प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी भाजपवरच तोफ डागली. येडियुरप्पा आणि मध्य प्रदेशातील भाजप सरकारमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा काँग्रेसने हाती घेतला आहे.
गेल्या तीन महिन्यांत मोदी सरकार सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरले आहे. हेच आम्ही प्रचाराच्या काळात राज्यातील जनतेसमोर मांडणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.