राज्यातील भाजपचे सरकार स्थापन होऊन दोन दिवस उलटत नाहीत तोच मुख्यमंत्रिपदाच्या झालेल्या निर्णयावरील अंतर्गत नापसंतीचे चित्र समोर आले आहे. मुख्यमंत्रिपदी बहुजन समाजातील व्यक्तीची निवड व्हावी अशी मागणी होती, असे मत व्यक्त करत महसुलमंत्री एकनाथराव खडसे यांनी त्यांना डावलल्याबद्दल अस्पष्टपणे नाराजी व्यक्त केली.
कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी पंढरीत दाखल झालेल्या खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना ही नाराजी प्रगट केली. ते म्हणाले, राज्यात भाजपचे सरकार येण्यामध्ये बहुजन समाजाचे मोठे योगदान असल्याने या समाजातील व्यक्तीची मुख्यमंत्रिपदी निवड व्हावी, अशी अनेकांची इच्छा होती. ही मागणी पूर्ण झाली नसली तरी ती करणेही काही गैर नव्हते. आपल्याला हे पद मिळाले नाही तरी आपण महसुलमंत्री पदावर पूर्ण समाधानी आहोत. सेना-भाजप युतीबाबत विचारले असता खडसे म्हणाले की, गेली २५ वर्षांची आमची युती असून अद्यापही आमची चर्चा आहे. लवकरच सेनाही आमच्याबरोबर सत्तेत सहभागी होईल.