शहरी व सभोवतालचा काही ग्रामीण भाग समाविष्ट असणाऱ्या नाशिक लोकसभा मतदारसंघात विधानसभेसाठी काही ठिकाणी तिरंगी तर काही जागांवर चौरंगी लढती होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांना मोठय़ा मताधिक्याने पराभूत केल्यामुळे महायुतीच्या भुजांमध्ये बळ आले आहे. परंतु, तिकीट न मिळाल्याने नाराजी, बंडखोरी आणि पालिका निवडणुकीत आकारास आलेली मनसे-काँग्रेस-राष्ट्रवादी-अपक्ष अशी महाआघाडी या बाबी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अवरोध निर्माण करू शकतात. गतवेळी राज ठाकरे यांच्या करिष्म्यामुळे या मतदारसंघातील निम्म्या जागा सहजपणे खिशात घालणाऱ्या मनसेसमोर आव्हान आहे.
मतदारसंघात मनसेचे ३, काँग्रेस २ आणि सेनेचा १ आमदार आहे. लोकसभा निवडणुकीत इगतपुरीचा अपवाद वगळता उर्वरित पाचही मतदारसंघात महायुतीने आघाडी घेतली होती. शहरवासीयांच्या नाराजीमुळे मनसेचे ‘डिपॉझिट’ जप्त झाले. भाजपने साथ सोडल्यानंतर पालिकेची सत्ता राखण्यासाठी अलीकडेच मनसेने राष्ट्रवादी व काँग्रेसशी हात मिळवणी केली. ही बाब मतदारांना कितपत रुचली त्याचे उत्तर विधानसभेच्या मतदानातून समोर येईल. सेनेने सर्वासाठी दरवाजे खुले केल्यामुळे इच्छुकांचे उदंड पीक आले आहे. जिल्ह्यात दहा जागा लढविण्याचे सूतोवाच मनसेने केले असले तरी सिन्नर व देवळाली मतदारसंघात सक्षम उमेदवाराचा शोध सुरू आहे. आघाडी व महायुतीतील उमेदवारांची निश्चिती झाली नसली तरी अनेकांनी प्रचारास सुरुवात केली आहे.

नाशिक मध्य
गतवेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस वसंत गिते यांनी  विजय मिळवला होता.  सेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते व माजी महापौर विनायक पांडे यांच्यात उमेदवारीसाठी चुरस आहे. तर, काँग्रेसतर्फे शाहू खैरे यांचे नाव चर्चेत आहे. काँग्रेसकडील ही जागा आपल्या ताब्यात घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. लाखभर अल्पसंख्यांकांची मते असणाऱ्या मतदारसंघात त्या समाजातील कोणी प्रबळ दावेदार रिंगणात उतरल्यास तिन्ही उमेदवारांची डोकेदुखी वाढू शकते. गिते यांची वैयक्तिक ताकद व सर्वपक्षीयांशी असणारे सख्य दुर्लक्षिता येणार नाही.  

नाशिक पश्चिम
राज ठाकरे यांच्या करिष्म्यामुळे मागील निवडणुकीत नितीन भोसले यांच्या माध्यमातून ही जागा अगदी सहजपणे मनसेच्या खिशात गेली. भोसले यांनी पुन्हा उमेदवारी गृहीत धरून जोरकस प्रचार सुरू केला आहे. भाजपच्या ताब्यातील या जागेवर प्रदेश चिटणीस नगरसेविका सीमा हिरे, गोपाळ पाटील यांची नावे चर्चेत आहेत. परंतु, हिरे यांच्या नावास बाहेरील उमेदवार म्हणून पक्षातून विरोध होत आहे. राष्ट्रवादीच्या कोटय़ातील ही जागा बदलून काँग्रेसला मिळावी म्हणून माजी महापौर दशरथ पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत.

नाशिक पूर्व
निवडणुकीत प्रचंड खर्च करावा लागतो, असे सांगत मनसेचे विद्यमान आमदार उत्तम ढिकले यांनी आधीच उमेदवारी करणार नसल्याचे जाहीर केले. यामुळे या मतदारसंघात मनसेवर प्रबळ अशा नव्या चेहऱ्याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. स्थायीचे माजी सभापती आर. डी. धोंगडे यांच्या नावाची मनसेकडून चर्चा आहे. भाजपकडून माजी उपमहापौर प्रा. देवयानी फरांदे व माजी महापौर बाळासाहेब सानप  इच्छुक आहेत. या साठमारीचा लाभ घेण्याचा गतवेळी तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या आघाडीचा प्रयत्न आहे. काँग्रेसच्या कोटय़ातील या जागेवर माजी मंत्री शोभा बच्छाव यांचे नाव चर्चेत आहे.

देवळाली-नाशिकरोड
गतवेळी राज करिष्म्यातही अभेद्य राहिलेला शिवसेनेचा बालेकिल्ला अशी या मतदारसंघाची ओळख. सलग पाच वेळा निवडून गेलेले सेनेचे आमदार बबन घोलप यांच्या मार्गात न्यायालयीन निकाल आडवे आल्याने पुत्र योगेशला रिंगणात उतरविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शहरी व ग्रामीण तोंडावळा लाभलेला हा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीच्या कोटय़ात आहे. गतवेळी घोलप यांना चांगली लढत देणाऱ्या नानासाहेब सोनवणेंना पुन्हा संधी दिली जाऊ शकते.

सिन्नर
काँग्रेसचे आमदार माणिक कोकाटे या मतदारसंघातून पुन्हा रिंगणात उतरणार असले तरी ते कोणत्या पक्षाकडून लढतात, याबद्दल उत्सुकता आहे. मागील निवडणुकीत अतिशय कमी फरकाने शिवसेनेने ही जागा गमावली होती. सेनेकडून राजाभाऊ वाजे इच्छूक आहेत. लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळांना या मतदारसंघातून तीव्र विरोध झाला होता. भुजबळ-कोकाटे यांचे सख्य सर्वश्रुत आहे. लोकसभेतील हिशेब राष्ट्रवादी चुकते करेल की काय याची काँग्रेसला धास्ती आहे. अलीकडेच कोकाटे यांनी सेनेचे दरवाजे ठोठावून पाहिले. परंतु, त्यांना उमेदवारीचा शब्द दिला गेला नाही. सेनेनेवाजेंना डावलून कोकाटेंना संधी दिल्यास वाजे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतात.

इगतपुरी
लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी व नंतर या मतदारसंघात अनेक स्थित्यंतरे झाली. शिवसेनेच्या ‘इनकमिंग’ धोरणामुळे गतवेळचे मनसेचे उमेदवार माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्यासह आधीपासून मोर्चेबांधणी करणारे शिवराम झोले व शासकीय सेवेचा राजीनामा देऊन दाखल झालेले चंद्रकांत खाडे अशी इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यातील कोणालाही उमेदवारी मिळाल्यास अंतर्गत धुसफुशीचे नाटय़ येथे रंगू शकते. लोकसभा निवडणुकीत हा एकमेव मतदारसंघ मोदी लाटेत आघाडीच्या पाठिशी उभा राहिला. काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी प्रचारास सुरुवातही केली आहे. मनसेकडून संदीप जाधव इच्छुक आहेत. पण, पक्ष आयात उमेदवारालाही प्राधान्य देऊ शकतो.