मंत्रिपद मिळवण्यासाठी स्वत:च्या जाती-धर्माचे कार्ड वापरणाऱ्या नेत्यांवर भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची वक्रदृष्टी आहे. या वक्रदृष्टीमुळे अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांना यंदा मंत्रिपदाने हुलकावणी दिल्याची चर्चा राजधानीत रंगली आहे. भाजपतर्फे देशातून जैन समाजातील आपण एकमेव खासदार असल्याने आपल्याला केंद्रात मंत्रिपद मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडे पत्राद्वारे करून गांधी यांनी पक्षनेत्यांची नाराजी ओढवून घेतली. या पत्रामुळे गांधी यांच्यावर पक्षश्रेष्ठींची खप्पामर्जी झाली आहे. विशेष म्हणजे हे पत्र दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचल्याने गांधी यांचे मंत्रिपदाच्या (माध्यमांपर्यंत पोहोचवल्या जाणाऱ्या) संभाव्य यादीतूनदेखील वगळण्यात आले!दिलीप गांधी यांच्या पत्रामुळे पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याचा दावा ११, अशोका रस्त्यावरील सूत्रांनी केला. पक्षाचा त्यांच्यावर व त्यांचा पक्षावर विश्वास असताना त्यांनी स्वत: अल्पसंख्याक (जैन) असल्याचा उल्लेख करून मंत्रिपदाची मागणी केल्याचे पक्षनेतृत्वाला रुचले नसल्याची भावना एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली.