मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत उतरलेल्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ६१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जळगाव व परिसरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खडसे यांची लोकप्रियता व कामगिरी दाखविणारे ते एकप्रकारे शक्तीप्रदर्शनच ठरणार आहे.
भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्यात स्पर्धा असली तरी खडसे यांनीही या आपण ही जबाबदारी पेलण्यास सक्षम असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या नाजूक तब्येतीमुळे काही अडथळे येत असले तरी त्यांच्याकडून आता पद्धतशीरपणे पावलेही टाकली जात आहेत. त्यांच्या वाढदिवशी जळगावात दरवर्षी काही कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदा हे कार्यक्रम अधिक मोठय़ा प्रमाणावर व ताकदीने होण्यासाठी खडसे यांचे कार्यकर्ते व हितचिंतक झटत आहेत.