‘बाबा, मी माझ्या परीने आटोकाट प्रयत्न केला आहे. प्रचंड कष्ट घेतले आहे. या कष्टाचं फळ मिळावं, असा आशीर्वाद मला द्या!’ असे भावनिक ट्विट भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. मुख्यमंत्रीपदाच्या प्रमुख दावेदार म्हणून त्यांचे नाव चर्चेत आहे.
बीडमधील सर्वच सहा जागा मी जिंकेन, तेच माझे लक्ष्य आहे, असेही पंकजा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच निवडणूक लढवणा-या पंकजा यांनी आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे म्हटले होते. 

राज्यामध्ये सरकार स्थापण्यात भाजप यशस्वी झाल्यास भाजपचे नेते एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि सुधीर मुनगुंटीवार यांच्या बरोबर पंकजा मुंडे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये असणार आहेत. पंकजा त्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या महत्त्वकांक्षेला ठामपणे दुजोरा देत आहेत. “माझे बाबा हे संपूर्ण राज्याचे लोकनेते होते. ते राज्यात काम करत होते तेव्हा इतर नेते त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यांमध्ये काम करत होते. मला माहीत आहे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमधील इतर नेते माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत. मात्र, मी देखील पहिल्यांदाच आमदार झालेली नाही. भाजप युवा मोर्चाची अध्यक्षा असताना मी राज्यभर फिरून सभा घेतल्या आहेत. तळागाळात जनसंपर्कवाढवला आहे.” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.