काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करीत केंद्र सरकारने माजी सरन्यायाधीश पलानीस्वामी सथशिवम् यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती केली. राज्यपालपद हे केंद्रीय पातळीवर सरन्यायाधीशपदापेक्षा दुय्यम मानले जाण्याचा प्रघात आहे. त्यामुळे ६५ वर्षीय सथशिवम् हे अशा प्रकारे राज्यपालपदासाठी निवडले गेलेले पहिलेच सरन्यायाधीश ठरले आहेत. तसेच नव्या सरकारतर्फे राज्यपालपदावर नेमणूक करण्यात आलेले सथशिवम् हे पहिलेच अ-राजकीय व्यक्तिमत्त्व ठरले. केरळच्या राज्यपाल शीला दीक्षित यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा राष्ट्रपती भवनातर्फे स्वीकारण्यात आला असून सथशिवम् यांची त्याजागी नियुक्ती करण्यात आल्याचे राष्ट्रपती भवनातर्फे जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले.