एरव्ही अशोका रस्ता हा नेहमीच गजबजलेला असतो. भाजप मुख्यालय असो वा केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांचे निवासस्थान! लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपने याच रस्त्यावरून रायसीना हिल काबीज केली. याच रस्त्यावर राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानाच्या थोडेसे पुढे ५०, अशोका रस्त्यावरील बंगल्यावर शनिवारी दिवसभर भेट देणाऱ्यांची गजबज होती. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या गच्छंतीला कोटय़वधींचा हातभार लावणाऱ्या कोळसा खाण गैरव्यवहाराची लक्तरे लोकसभेत टांगणारे चंद्रपूरचे हंसराज अहिर यांचे हे निवासस्थान! केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पूर्वसंध्येला हा बंगला अहिरांच्या हितचिंतकांच्या भेटीने गजबजला होता.
आपली भावना व्यक्त करताना अहिर म्हणाले, खासदारांनी आपला लढा सभागृहातच द्यावा. न्यायव्यवस्था व रस्त्यावरील संघर्षांत सामान्यांचा सहभाग असू शकतो. पण लोकसप्रतिनिधींनी केवळ सभागृहातच व्यवस्थेसाठी लढले पाहिजे. कारण लोकप्रतिनिधी कायदे करीत असतात. न्यायव्यवस्था कायद्यावर आधारित निर्णय देते. कोळसा खाण घोटाळा बाहेर काढण्यासाठी मी कधीही माहिती अधिकार कायद्याचा वापर केला नाही. कारण एक खासदार म्हणून मला माझे अधिकार माहीत होते. त्या अधिकाराचा धीटाईने वापर करून मी कोळसा खाण गैरव्यवहाराची पाळेमुळे शोधून काढली. या लढय़ाला न्यायालयीन स्वरूप देण्यासाठी भाजपच्याच एका नेत्याने सूचना केली होती. परंतु मी मात्र हा लढा संसदेतच दिला पाहिजे, या मतावर ठाम होतो, आजही आहे. यातच कोळसा खाण गैरव्यवहाराविरोधातील लढय़ाचे गमक आहे.
पक्षाने आपल्याला खूप दिल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.आजवरच्या प्रवासात विजय राऊत, शोभाताई फडणवीस यांचा वाटा खूप मोठा आहे. शोभाताईंनी तर मला बोटाला धरून राजकारण-समाजकारण शिकवले. परंतु आता राजकारण बदलल्याची खंतही अहिर यांनी व्यक्त केली.