बोरिवलीत गुरुवारी संध्याकाळी नाकाबंदीच्या वेळी एका जीपमधून ५० लाखांची रोकड सापडली. दहिसर येथील भाजप उमेदवार मनीषा चौधरी यांच्यासाठी ही रोकड नेली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही रोकड नेमकी कुणासाठी आणली होती त्याच बोरिवली पोलीस तपास करत आहेत.
बोरिवलीच्या सुधीर फडके उड्डाणपूलाजवळ नाकाबंदी सुरू असताना भरारी पथकाने ही गाडी अडवून रोकड जप्त केली. हा पक्षाचा निधी असून तो उमेदवारांसाठी नेला जात होता असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांनी सांगितले. त्यांनी यासाठी जनकल्याणा बॅंकेतून रक्कम काढल्याच्या पावत्याही सादर केल्या. प्राप्तिकर खात्याला याबाबत कळविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
अमळनेर तालुक्यात  एक कोटी रूपये जप्त
अमळनेर:आवश्यक कागदपत्रे सोबत नसल्याने निवडणूक भरारी पथकाने गुरूवारी धुळे-अमळनेर रस्त्यावरील चोपडाई गावाजवळ एका खासगी गाडीतून एक कोटी रूपयांची रक्कम जप्त केली. ही रक्कम अमळनेर येथील शासकीय कोषागारमध्ये जमा करण्यात आली आहे.या रकमेसोबत धुळे येथील जळगाव जनता बँकेचे चार कर्मचारीही होते.
नागपूरमध्ये वाहनातून ७० लाख जप्त
निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने गुरुवारी एका कारमधून ७० लाख रुपये जप्त केल्याने खळबळ उडाली. व्यावसायिक व्यवहारातील ही रक्कम असल्याचे एका महिलेने सांगितले. मात्र, एका राजकीय नेत्याला ही रक्कम पोहोचवली जात असल्याचे अनधिकृत वृत्त असले तरी पोलिसांनी यास दुजोरा दिलेला नाही.
महाराष्ट्रात ११ कोटी;  हरयाणात ४८ लाख जप्त
 नवी दिल्ली :मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून त्यांना पैसे, वस्तू वा मद्याचे वाटप करण्यात येत आहे. या प्रकारांना आळा बसविण्यासाठी निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलली आहेत. आयोगाने तयार केलेल्या भरारी पथकाने महाराष्ट्रातून आतापर्यंत तब्बल ११,३६,४८,८८५ रुपये आणि ७० लाख रुपये किंमत असलेली दोन लाख लिटर मद्य जप्त केले आहे.हरयाणामध्येही आयोगाच्या भरारी पथकाने ४८,६०,५०० रुपयांची रोकड आणि मद्याचे ९७२ बाटल्या जप्त केल्या आहेत. निवडणुकीदरम्यान बेकायदा निधी ुकाळा पैशांचा मोठय़ा प्रमाणावर वापर होत असल्याचे  निवडणूक आयोगाच्या लक्षात आले असून, त्यावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.