विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा अखेरचा दिवस नाटय़मय असणार हे अगोदरच स्पष्ट असल्याने, सकाळी नऊ वाजण्याआधीच विधान भवनाच्या परिसरात गर्दी सुरू झाली, आणि नवे काहीतरी हाती लागणार हा अंदाजही खरा ठरू लागला. विरोधात बसण्याचा शिवसेनेचा निर्णय बुधवारी रात्रीच रामदास कदम यांनी जाहीर केला होता. तर अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपच्या गोटात हालचालींनी वेग घेतला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही सेना- काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधून उमेदवार मागे घेण्याचे आवाहन केले होते. पण तेव्हा ती चर्चा यशस्वी झाली नाही. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीतच फडणवीस सरकारच्या बळाचे चित्र स्पष्ट होणार, असे दिसू लागल्याने पडद्यामागील हालचालींना प्रचंड वेग आला..त्यानंतरच घडलेला घटनाक्रम
*सकाळी १० : सरकारच्या विरोधात बसण्याची घोषणा करणारे रामदास कदम आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्र्यांच्या दालनात चर्चेसाठी गेल्याने  सेनेत पुन्हा अस्वस्थता पसरली.
*१०.४५ : सेना-भाजप वाटाघाटी फिसकटल्याचेही स्पष्ट झाले, तरी अचानक काँग्रेस आणि शिवसेनेच्या गोटातही अस्वस्थता पसरली. निवडणुकीत मतांची फाटाफूट झाली, तर विरोधकांवर कुरघोडी केल्याचे श्रेय सहजच भाजपला मिळेल या शंकेची कुजबूज सुरू झाली आणि धोका पत्करण्याऐवजी, उमेदवार मागे घेण्याचा सुरक्षित मार्ग शिवसेना आणि काँग्रेसनेही स्वीकारला. अखेर भाजपचे उमेदवार हरिभाऊ बागडे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली, आणि सभागृहाचे नियमित कामकाज सुरू झाले.
*दु. १२.३० : विरोधी बाकांवर बसलेले राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी शिवसेनेवर चौफेर टोलेबाजी सुरू केली. पुढच्या दहा मिनिटांत सभागृहाचा नूर पालटला. सत्ताधारी बाकांवरून आमदार आशीष शेलार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला, आणि काही क्षणांतच आवाजी मतदानाने तो मंजूरही झाल्याचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जाहीर केले. या ठरावावर मतदान झाले पाहिजे अशी मागणी सभागृहात सुरू झाली, त्याच गोंधळात अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्याची निवडही जाहीर केली. एव्हाना, शिवसेनेची विरोधकांची भूमिका स्पष्ट झाली होती, तर आवाजी मतदानामुळे राष्ट्रवादीची भूमिकाही गुलदस्त्यात राहिली. सभागृहाचे कामकाज सुरू झाले तरी गोंधळ सुरूच होता. अखेर पुन्हा एक वाजून दहा मिनिटांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. सरकारविरोधी घोषणाबाजी सुरू झाली, आणि विधान भवनाभोवती काहीसा तणावही पसरला.  
*दु. १.३० : कामकाज पुन्हा सुरू.  तेव्हाही सभागृहात प्रचंड गदारोळच होता. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला गेला. शिवसेना आणि काँग्रेसच्या बाकांवरून मतदानाच्या मागणीसाठी घोषणाबाजी सुरूच होती. या गोंधळामुळे, राज्यपालांचे पहिले अभिभाषण तणावात पार पडणार, असे चित्र स्पष्टच झाले होते. राज्यपालांनी अभिभाषणासाठी जाऊ नये, अशी मागणीच काँग्रेसने केली,
*दु. ४.०० : विधान भवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेसने ठिय्या मारला. चार वाजून दहा मिनिटांच्या सुमारास राज्यपालांची गाडी प्रवेशद्वारातून आत येत असतानाच पुन्हा घोषणाबाजी सुरू झाली. अभिभाषणानंतरच्या एका नव्या नाटय़ाची सुरुवात झाली होती.
 राज्यपालांना फटका
*विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर केल्याने भाजप विरुद्ध काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात जुंपली असतानाच त्याचा फटका अभिभाषणासाठी विधान भवनात आलेल्या राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना बसला.
*बहुमत सिद्ध करू न शकलेल्या सरकारच्या वतीने अभिभाषण करू नये, अशी काँग्रेसची भूमिका होती. राज्यपालांच्या आगमनापूर्वीच काँग्रेसच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसकण मांडून घोषणाबाजी सुरू केली.
*राज्यपालांचे आगमन होताच घोषणा देत त्यांची गाडी मुख्य प्रवेशद्वारापाशी शिवसेनेच्या आमदारांनी अडविली. विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे आणि दिवाकर रावते यांनी गाडीपाशी जाऊन आपले म्हणणे राज्यपालांकडे मांडले. मग राज्यपालांची गाडी पायऱ्यांजवळ येताच काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले.
*‘राज्यपाल परत जा’ अशा घोषणा देत काँग्रेस आमदारांनी राज्यपालांची वाट रोखून धरली. बराच वेळ सुरक्षा रक्षकांनी राज्यपालांना गाडीच्या बाहेर येऊ दिले नाही. थोडय़ा वेळाने राज्यपाल गाडीतून खाली उतरले असता काँग्रेस आमदारांनी त्यांना पुढे जाण्यापासून मज्ज्वाव केला. तेव्हा सुरक्षा रक्षक आणि आमदारांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली.
*भाजपच्या वतीने गिरीश महाजन हे राज्यपालांच्या मदतीला धावून आले. या गोंधळात काही सुरक्षा रक्षकांचे पायातील बूट निसटले. शेवटी जवळपास २० मिनिटांच्या प्रयत्नांनंतर  कसेबसे सुरक्षा रक्षकांनी राज्यपालांना लिफ्टपर्यंत नेले.
*धक्काबुक्कीत राज्यपाल विद्यासागर राव यांच्या डाव्या हाताला दुखापत झाल्याचा आरोप महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सभागृहात केला. मात्र, राज्यपालांना सुरक्षा रक्षकांनी घेरले होते. त्यांना मारहाण वा दुखापत झालेली नाही, असे काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.