पितृ पंधरवडय़ाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आणि आचारसंहिता लागू होणार अशी जोरदार चर्चा कालपासूनच सुरू झाल्याने राजकीय पक्षांच्या नेत्यांचे, संभाव्य उमेदवारांचे आणि असंख्य इच्छुकांचे धाबे दणाणले. आता पंधरा दिवस वाया गेले, उमेदवारी अर्ज भरता येणार नाही आणि प्रचाराचा नारळही फोडता येणार नाही या चिंतेने अनेकजण धास्तावले. राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठकही घाईघाईने दुपारीच पार पडली आणि आचारसंहितेच्या धसक्याने निर्णयही जाहीर करण्यात आले.. पण दिवस मावळला तरी निवडणुकीची घोषणा झालीच नाही. पंधरवडय़ाचा पहिला दिवस पार पडल्याच्या भावनेने अनेकांनी निश्वास टाकले.
दिल्लीतील निर्वाचन भवनातील महत्वाच्या पत्रकार परिषदाचे वार्ताकन करण्याबाबत वृत्तवाहिन्या आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींकरिता एक सूचनापत्र अनंत चतुर्दशीच्या दिवशी निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आले आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याचा मुहूर्त जवळ आल्याचा निरोप कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला. मंगळवारी, पितृपंधरवडय़ाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत पत्रकार परिषद होणार आणि निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार, अशी चर्चाही सुरू झाली. काही वाहिन्यांनी तर आवेशात निवडणुकीच्या तारखाही वर्तवून टाकल्या. राज्यातील निवडणुका किती टप्प्यांत होणार तेही जाहीर करून टाकले. आता घोषणेची केवळ औपचारिकताच उरणार असे वातावरण तयार झाल्याने राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारची बैठकही काहीशी लवकरच उरकण्यात आली. नेहमी ही बैठक सायंकाळी पार पडते. पण सायंकाळी निवडणूक आयोगाने आचारसंहिता जारी केली तर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊनही जनतेपर्यंत पोहोचणार नाहीत या शंकेने मंत्रिमंडळ बैठक लवकर संपविण्यात आली आणि निर्णय जाहीर झाल्यावर सर्वांचे डोळे निवडणूक आयोगाच्या घोषणेकडे लागले. आचारसंहिता व निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा अवधी जेवढा लांबेल, तेवढे पितृपंधरवडय़ाचे सावट दूर होईल अशा अपेक्षेने अनेकजण मनोमन धावा करीत आहेत. पहिला दिवस अपेक्षेप्रमाणे पार पडल्याने एका दिवसापुरता तरी, अनेकांचा जीव भांडय़ात पडला आहे..

तारखा जाहीर झाल्यानंतर लगेचच राज्यातील तयारीबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्याकरिता आयोगाच्या राज्य शाखेची धावपळ सुरू झाली. पण मंगळवारचा दिवस नेहमीसारखाच मावळला. निवडणुकीची घोषणा झालीच नाही, आणि एक दिवस पार पडल्याच्या भावनेने सर्वांना हायसे वाटले. पितृ पंधरवडय़ात शुभ कार्याला प्रारंभ करू नये असा समज राजकीय क्षेत्रातही असतो. त्यामुळे ऐन पंधरवडय़ात उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली तर काय करायचे या चिंतेचे सावट अनेकांच्या मनात दाटले.