शिवसेना-भाजपा युतीचा घटस्फोट आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीची बिघाडी यांमुळे या पक्षांमध्ये नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असली तरी युती आणि आघाडीतील हे ‘घटस्फोट’ फटाका उद्योगासाठी मात्र दिवाळीपूर्वीची दिवाळी ठरले आहेत. निवडणुका आणि दिवाळीमुळे फटाका बाजारात तेजी आली असून यंदा किमान ४०० कोटींची उलाढाल होईल, अशी अपेक्षा आहे. शिवाय आकर्षक चिनी फटाक्यांची चोरटी आयात सुरूच असल्याने फटाका बाजाराचे रंग बहरले आहेत.
गणपती आणि दिवाळी हे फटाका उद्योगासाठी सुगीचे सण. वर्षभर या उद्योगाला फारशी बाजारपेठ नसली तरी या दोन उत्सवात वर्षभरातील व्यवसायाची उणीव भरून काढली जाते. यावेळी मात्र दिवाळीच्या तोंडावरच आलेल्या निवडणुका आणि त्यातही उमेदवारांची भाऊगर्दी यामुळे फटाका उद्यागोसाठी खरोखरच ‘अच्छे दिन’ येण्याची अपेक्षा फटाका व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र निवडणुकांवर डोळा ठेवून उत्पादकांनीही फटाक्यांच्या किंमतीत १५ ते २० टक्के वाढ केली असून त्याचा सामान्यांनाच फटका बसणार आहे. सध्या प्रचारासाठी सर्वच उमेदवारांकडून फटाक्यांच्या माळांना मोठी मागणी आहे. निकालादरम्यान ही मागणी आणखीनच वाढेल. त्यातच चुरशीच्या लढतींमुळे उमेदवार पैसे बाहेर काढू लागले आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत चांगला व्यवसाय होईल, असा विश्वास या व्यवसायातील व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. त्याचवेळी बंदी असतानाही चीनचे फटाके छुप्या मार्गाने बाजारात येत असल्याने आणि स्वस्ताईमुळे त्याला मागणीही वाढत असल्याने या उद्यागोसाठी धोक्याची घंटा असल्याचेही बोलेले जात आहे. निवडणुकांमुळे सध्या फटाक्यांच्या माळांना चांगली मागणी आहे. निकालानंतर आचारसंहितेच्या नावाखाली मिरवणुकाना बंदी घातली जाते. विजयी उमेदवारांना फटाके फोडू दिले जात नाहीत. त्यामुळेही फटाक्यांच्या विक्रीवर परिणाम होतो. तरीही यंदाची दिवाळी चांगलीच जाईल, असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.
राज्यात काँग्रेसपक्षाला चांगले यश मिळाले तर फटाके अधिक फुटतील मात्र भाजपाचा विजय झाला तर अधिक प्रमाणात फटाके फुटतीलच असे सांगता येणार नाही असे महमदअल्ली रोडवरील प्रख्यात फटाका व्यापारी ईसाभाई यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर फटाक्यांना मागणी आली नव्हती. त्याचवेळी लोकसभेत सपाटून मार खाल्लयामुळे आता यश मिळाल्यास काँग्रेस दिवाळी साजरी करील असेही त्यांनी सांगितले. तर सर्वच पक्ष स्वतंत्र लढत असल्यामुळे आणि या निवडणुका चुरशीच्या होत असल्यामुळे आज फटाक्यांना चांगली मागणी आहे. दिवाळीतही अशीच मागणी असेल असे क्लासिक फटाका दुकानाचे नवीनभाई यांनी सांगितले.
किरकोळ विक्रेत्यांना मात्र फटका
दिवाळीत फटाक्यांची किरकोळ विक्री मोठय़ा प्रमाणात होते. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मैदानात स्टॉल लावून फटाके विक्री केली जाते. मात्र यंदा निवडणुकीचे कारण पुढे करीत पोलिस आणि महापालिकांकडून परवानगी देण्यात टाळाटाळ केली जात आहे. निवडणुकीनंतर परवानगी दिली जाईल असे सांगितले जात आहे. त्यामुळे दिवाळीत परवानगी कधी घ्यायची आणि विक्री कधी करायची असा प्रश्न छोटय़ा व्यापाऱ्यांकडून विचारला जात आहे.