टू-जी आणि कोळसा घोटाळ्यांची जबाबदारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीच आहे. विशेषत: टू-जी घोटाळ्याची जबाबदारी तर मनमोहन सिंग टाळूच शकत नाहीत, अशी कठोर टीका हे दोन्ही घोटाळे आपल्या अहवालांतून उघडकीस आणणारे माजी महालेखापरीक्षक विनोद राय यांनी केली आहे. राजकारण म्हणजे केवळ सत्तेवर टिकून राहण्याची कला एवढेच असते का, असा सवालही यानिमित्ताने राय यांनी केला आहे. या घोटाळ्यांमध्ये मनमोहन सिंग यांचे नाव येऊ नये यासाठी काँग्रेस नेत्यांनी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोपही राय यांनी केला आहे.
‘आऊटलूक’ साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत राय यांनी मनमोहन सिंग यांच्यावर प्रखर हल्ला चढवला. मनमोहन यांच्या मानसिकतेविषयी तुमचे मत काय, असा प्रश्न राय यांना विचारला असता, चांगल्या राजकारणाची परिणती चांगल्या अर्थकारणात होते, असे म्हणतात. परंतु चांगले राजकारण म्हणजे केवळ सत्तेत टिकून राहणे एवढेच असते का, असा उलट सवाल राय यांनी केला.
टू-जी आणि कोळसा घोटाळ्यासंदर्भात राय यांनी या मुलाखतीत सविस्तर विवेचन केले आहे. टू-जी घोटाळ्याची जबाबदारी तर मनमोहन सिंग नाकारूच शकत नाहीत. टू-जी स्पेक्ट्रमचे वितरण ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वाने करण्याच्या निर्णयात मनमोहन सिंगही सहभागी होते, असे आपले मत असल्याचे राय यांनी म्हटले. टू-जी घोटाळ्यातील सर्व पत्रे तत्कालीन दूरसंचार मंत्री ए. राजा यांनी मनमोहन सिंग यांना लिहिली आहेत आणि पंतप्रधानांनी या सर्व पत्रांना उत्तरेही दिली आहेत. याच अनुषंगाने आपण लिहिलेल्या पत्रांना उत्तर देण्यास मात्र पंतप्रधानांना वेळ नव्हता. वर एका प्रत्यक्ष बैठकीत ‘तुम्ही माझ्याकडून तुमच्या पत्राला उत्तर देण्याची अपेक्षा करणार नाहीत’, असेही पंतप्रधानांनी बोलून दाखविले, असा दावा राय यांनी केला आहे.
राय यांनी टू-जी घोटाळ्यात देशाचे १.७६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर १६ नोव्हेंबर २०१० रोजी पंतप्रधानांनी आपल्याला टू-जीमधील नुकसान मोजण्याची त्यांची पद्धत चुकीची असल्याचे सांगितले. तेव्हा ही पद्धत तुम्हीच आम्हाला शिकवली होती, अशी आठवणही राय यांनी या मुलाखतीत उलगडली आहे.