राष्ट्रवादीची अरेरावी सहन करूनही सध्या विधानसभा निवडणुकीत आघाडी कायम राखण्याच्या आणाभाका घेणाऱ्या काँग्रेसच्याच ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ‘स्वबळावर’ निवडणूक लढवण्याची विनंती केली होती. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे या नेत्यांनी एकत्रितपणे सोनिया गांधी यांची भेट घेवून राष्ट्रवादीशी काडीमोड घेण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु, अंतिम निर्णय होण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेत आघाडी निश्चित असल्याचे वक्तव्य केले होते.
यासंदर्भात शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही (ठाकरे-चव्हाण) एकत्रितपणे सोनिया गांधी यांना भेटलो होतो. अशा भेटी होतच असतात. परंतु या बैठकीचा तपशील मी सांगणार नाही. दरम्यान, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच काँग्रेस नेत्यांच्या त्रिकुटाने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा प्रस्ताव सोनिया गांधी यांना दिला होता. गेल्या पंधरा वर्षांच्या सत्ताकाळात आघाडी सरकारविरोधात जनतेमध्ये रोष आहे. मात्र काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीवर लोकांचा राग जास्त आहे. राष्ट्रवादी काँँग्रेसच्या मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे चव्हाटय़ावर आली. परंतु त्यामुळे काँग्रेस पक्ष राज्यात बदनाम झाला. शिवाय राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाषा अत्यंत अरेरावीची असते. राष्ट्रवादीला सोबत न घेतल्यास आपल्याला लाभ होऊ शकतो, असा प्रस्ताव या नेत्यांनी दिला होता.  शिंदे-चव्हाण-ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्यात स्वबळाची चर्चा झाली होती, असे सूत्रांनी स्पष्ट केले. केंद्रीय निवडणूक समितीचा सदस्य असलेल्या या नेत्याने सांगितले की, या त्रिकुटाने दिलेला प्रस्ताव मान्य केला असता,  तर राष्ट्रवादीच्या अरेरावीला प्रत्युत्तर देता आले असते.