राज्यातील विधानसभा निवडणुकीत बसपच्या स्टार प्रचारक म्हणून उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती ७ ते १० ऑक्टोबर असा चार दिवस प्रचार दौरा करणार आहेत. ठाणे, नाशिक, जालना, औरंगाबाद, भंडारा, गोंदिया, नागपूर इत्यादी ठिकाणी त्यांच्या प्रचारसभा होणार आहेत, अशी माहिती बसपचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. सुरेश माने यांनी दिली.
रिपब्लिकन पक्षांतील गटबाजीला कंटाळलेला दलित समाज आणि आरक्षणाच्या प्रश्नावर दुखावलेल्या आदिवासी व ओबीसी समाजाला आपलेसे करण्याचा बसपचा प्रयत्न राहणार आहे. बसपने नेहमीप्रमाणे विदर्भावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी स्वतंत्र विदर्भ हा मुद्दा त्यांनी प्रभावीपणे त्यांच्या प्रचारात आणला आहे.
महाराष्ट्रात आरक्षणाच्या राजकारणावरुन विविध समाज घटकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आदिवासी विरुद्ध धनगर, मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा केला आहे, त्याचा फायदा घेण्याचा बसपचा प्रयत्न आहे. दलितांबरोबर ओबीसींना बसपने लक्ष्य केले आहे. त्यांनी ओबीसींच्या जनगणनेचा मुद्दा प्रचारात आणला आहे. इंदू मिलच्या जमिनीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा विषय काँग्रेसने कसा रेंगळात ठेवला, यावर विशेष भर देत, काँग्रेसवर निशाना साधला जात आहे. रामदास आठवले यांनी भाजपबरोबर युती केल्यामुळे दलित समाजात नाराजी आहे. रिपब्लिकन गटबाजीलाही दलित समाज वैतागला आहे. त्याला आपलेसे करण्याचा बसपचा प्रयत्न आहे. मायावती यांच्या प्रचारसभांमध्ये दलित, ओबीसी आणि स्वतंत्र विदर्भ या मुद्यांवर भर दिला जाणार आहे. या वेळी राज्यातील किमान २५ मतदारसंघात बसप वेगळे निकाल घडवून आणील, असा सुरेश माने यांचा दावा आहे.